राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:36 AM2024-05-05T06:36:37+5:302024-05-05T06:37:00+5:30

पाऊस वेळेत झाल्यासच पाणीटंचाईची समस्या सुटू शकेल. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

State's water scarcity crisis more alarming; Water storage at 28 percent; 2,952 tankers in 2,344 villages | राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू

राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील विविध प्रकल्पांतील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे.  मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणीसाठा २८ टक्क्यांवर आला. त्यामुळे सध्या २,३४४ गावे व ५,७४९ वाड्यांना २,९५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास पाणीपुरवठ्याची स्थिती आणखी चिंताजनक होणार आहे. त्यापैकी सर्वांत गंभीर परिस्थिती पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आहे.

मागील वर्षी कमी झालेले पाऊसमान व यंदाच्या वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला आहे. सध्या धरणांमध्ये २८.०६ टक्के पाणीसाठा असून तो गेल्यावर्षी ४०.२८ टक्के होता. यात सर्वाधिक धरणे ही छ.संभागीनगर विभागात असून ९२० धरणे असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३५ टक्क्यांनी घटला आहे. गेल्यावर्षी येथे ४६.७९ टक्के पाणीसाठा होता. तो आता फक्त ११.८९ टक्क्यांवर आला आहे.
पावसाने ओढ दिल्यास काय?
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. एल निनोचा प्रभाव ओसरल्याने पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल असे सांगण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा पाऊस वेळेत झाल्यासच पाणीटंचाईची समस्या सुटू शकेल. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

छ. संभाजीनगर, पुणे, नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई
nछ.संभागीनगर जिल्ह्यातील आपेगाव व पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी अत्यंत खाली आली आहे. आपेगाव धरणात २६.८६ टक्के, तर १०२ टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी धरणात सध्या केवळ ७.९७ टक्के पाणी 
शिल्लक आहे. 
nनाशिकमध्ये अवघा ३०.६५ टक्के पाणीसाठा असून पुण्यात तर २३.६९ टक्के पाणीसाठा धरणांत आहे. पुणे विभागात ५७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, नाशिकमध्ये ६५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे सध्या छ.संभाजीनगर, पुणे, नाशिक विभागात पाणीटंचाईचे संकट गंभीर आहे.

वर्षभरात टँकरची संख्या १०० वरून तीन हजारांवर
राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात सध्या २,९५२ टँकरद्वारे २,३४४ गावे आणि ५,७४९ वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापैकी २,८६४ खासगी टँकर, तर ८८ सरकारी टँकर आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ६३६ टँकरद्वारे ३९३ गावे, तर ५९ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ जालन्यात ४४२, बीडमध्ये ३१०, नाशिकमध्ये २९४, अहमदनगरमध्ये २६७, सांगलीत १८३, पुण्यात १६९ टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे.
मागील वर्षी याच काळात अवघे १०१ टँकरद्वारे १११ गावे आणि २५९ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, यंदा टँकरचा आकडा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तीन हजारांजवळ पोहोचला आहे. यावरून पाणीटंचाईची भीषण तीव्रता लक्षात येते.

Web Title: State's water scarcity crisis more alarming; Water storage at 28 percent; 2,952 tankers in 2,344 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.