Structural Audit; सीना नदीवरील कमानी पूल १२२ वर्षांनंतरही सेवेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 03:23 PM2019-05-13T15:23:15+5:302019-05-13T15:25:46+5:30
स्ट्रक्चरल आॅडिटचा पत्ता नाही; दोन वर्षांपूर्वीच गेला प्रस्ताव
इरफान शेख
कुर्डूवाडी : कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावर असणाºया रिधोरे-पापनसदरम्यान सीना नदीवरील जुन्या कमानी पुलाला १२२ वर्षे लोटली. तरीही स्ट्रक्चरल आॅडिट झालेच नाही. पूर्वी रेल्वेच्या ताब्यात असलेला हा पूल नॅरोगेज बंद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आला. २०१७ साली फेब्रुवारी ते जूनदरम्यान याचे इन्स्पेक्शन करुन स्ट्रक्चरल आॅडिटसाठी उपअभियंता यांनी पत्र दिले होते. मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही.
या पुलाच्या भिंतीवर आलेली झाडे- झुडपे काढून टाकणे, वरच्या बाजूला तुटलेले रेलिंग बसविणे, मध्यान्ह लाईन साफ करणे, काँक्रीट पिलरला जॅकेटिंगसाठी काँक्रिटिंग करणे, आर्चेसिंगचे मजबुतीकरण करणे, त्याची डागडुजी करणे, नाल्याचे पात्र साफ करणे अशा सूचना सुचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्याचे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करुन मुख्य अभियंता यांना देण्यात आले. त्यानुसार २७ एप्रिल २०१९ रोजी स्वत: मुख्य अभियंता यांनी पाहणी केली़ त्यांच्या परीक्षणातून पुढे निर्णय घेतला जाणार आहे.
पुलावरील वाहतूक वाढल्यामुळे शासनाने २०१३ साली या पुलाला समांतर दुसरा पूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. हा नवीन पूल १७२ मीटर लांब, रुंदी ७.५ मीटर रुंदीचा असून, यात २८.७० मीटरचे ६ गाळे करण्यात आले आहेत. याचे ५ कोटींचे इस्टिमेटचे काम २०१६ साली पूर्ण झाले. मात्र त्याला अप्रोच रोड नव्हता, त्याचेही काम सध्या पूर्ण असून, यासाठी २ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यानुसार बार्शी काउंटर बाजूला फोल्डर बॉक्स रिटर्न बांधण्यात आले़ येत्या महिनाभरात कार्यान्वित होणार आहे.
पुलाचे बांधकाम १८९७ मधील
१८९७ साली युरोप कन्स्ट्रक्शनने बांधलेला जुना कमानी पूल १५७.८५ मीटर लांबी व रुंदी ६ मीटर आहे. यात १४.३५ मीटरचे ११ गाळे होते. यात रेल्वे ट्रॅक २ मीटरचा व वाहतुकीसाठी ४ मीटरचा रस्ता होता. यावरुनच लातूर-मिरज नॅरोगेज रेल्वे गाडी धावायची. त्याच्या लगतच्या रस्त्यावरुन पुण्याहून मराठवाड्याकडे जा-ये करणारी वाहतूक याच पुलावरुन होत होती. रस्ता एकेरी असल्याने केवळ एकाच बाजूची वाहतूक होत होती. पूल ओलांडण्यासाठी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत होत्या. मात्र नॅरोगेज रेल्वे बंद झाल्यानंतर २ मीटरचा ट्रॅक पत्रव्यवहार करुन ताब्यात घेण्यात आला. व त्यावर भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी वापरात आला होता.