आंबोलीमधील कावळेसाद दरीत पुन्हा दोन मृतदेह सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 02:50 PM2017-11-16T14:50:54+5:302017-11-16T14:53:15+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीजवळील कावळेसाद पॉइंट येथील दरीत पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीजवळील कावळेसाद पॉइंट येथील दरीत पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, हे मृतदेह कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी सावर्डे येथील सिध्दार्थ मोरे व नयना मोरे ही दोघे चुलत भाउ बहीण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सांगली येथील अनिकेत कोथळे याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर कोथळे याला पोलिसांनी आंबोलीतील महादेवगड पॉर्इंट येथे आणून जाळले होते. त्यानंतर कोल्हापूर येथील एका शिक्षकाचा मृतदेह येथे आढळला होता.
आंबोली येथील कावळेसाद दरीत दोन मृतदेह आढळल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केल्यावर हे मृतदेह कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी सावर्डे येथील सिध्दार्थ मोरे व नयना मोरे ही दोघे चुलत भाउ बहीण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सिध्दार्थ मोरे व नयना मोरे ही दोघे चुलत भाऊ-बहीण एक महिन्यापूर्वी दुचाकीवरून आंबोलीत आले होते. त्यानंतर पोलिसांना कावळेसाद पाँईटजवळ त्यांची दुचाकी बेवारस स्थितीत आढळली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून सदर दुचाकी कोल्हापूर जिल्हयातील मुरगूड पोलिसाच्या ताब्यात दिली होती.
मुरगुड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल आहे. दरीत दोघाच्याही मृतदेहाचे शिल्लक आहेत. या अवशेषांच्या कपड्यांवरून ओळख पटवण्यात आली आहे. मृतदेह दरीतून वर आणण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणा-या रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यात आले असून, सीसीटीव्हीही सुरू करण्यात आला आहे.