व्यापा-यांवरील साखर साठा मर्यादा हटविली, केंद्राचा अध्यादेश : दर वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:18 AM2017-12-20T02:18:27+5:302017-12-20T02:18:34+5:30
व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे.
चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे.
गेल्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी एप्रिल २०००पासून केंद्राने व्यापाºयांवर साखरसाठा मर्यादा लागू केली होती. ३१ डिसेंबर रोजी तिची मुदत संपत आहे. यंदाच्या साखर हंगामात पहिल्या अडीच महिन्यांत ३० टक्के म्हणजे ६९ लाख ४० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत ते ५३ लाख ४६ हजार टन इतके होते. सध्या घाऊक बाजारातील साखरेचे दर ३००० ते ३१५० रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. सरकारच्या निर्णयाने मागणी वाढून साखरेचे दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेर २५ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले. गतवर्षी याच कालावधीत ते १७ लाख २५ हजार टन होते. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात २३ लाख ३७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
साठा मर्यादा हटविण्याचा निर्णय म्हणजे व्यापाºयांना साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने दिलेली नाताळची भेट आहे.
- प्रफुल्ल विठलानी, चेअरमन,
आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन
साठा मर्यादा काढून टाकण्याची मागणी अनेक महिने करत होतो. नियंत्रणमुक्त केल्याने कोसळणारे दर थोडे सावरतील, पण बॅँकांची उचल आणि उसाची पहिल्या उचलीचा ताळतंत्र घालताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.
- पी. जी. मेढे,
साखर कारखानदारीचे तज्ज्ञ