500 उठाबशा काढायला लावणा-या मुख्याध्यापिकेचं निलंबन करा, आमदार कुपेकरांची विधानसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 12:26 PM2017-12-15T12:26:44+5:302017-12-15T12:37:04+5:30
कोल्हापुरात गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी आज विधानसभेमध्ये चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली.
नागपूर: कोल्हापुरात गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी आज विधानसभेमध्ये चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांच्यावर कठोर कारवाई न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थिनिच्या प्रकृतीत अजूनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने तिला लवकरच मुंबईच्या केईएम रूग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याची माहिती दिली होती. तसंच या प्रकरणाची चौकशी करुन गरज पडली तर फौजदारी कारवाई केली जाईल असं विनोद तावडेंनी सांगितलं होतं.
विद्यार्थिनीवर उपचार सुरू, पण मुख्याध्यापिकेवर अद्याप कारवाई नाही -
गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापूरात एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली. तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. उठबशा काढल्याने विद्यार्थिनीच्या पायाला सूज आली असून तिच्यावर सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा दिली. 300 उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, शिक्षिका अश्विनी देवाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी अजूनही या शिक्षिकेवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.