शिक्षकांची यंदाची दिवाळी आनंददायी व प्रकाशमान, परंतु काहींना स्वार्थापोटी शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसते- विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 06:52 PM2017-10-18T18:52:26+5:302017-10-18T18:53:00+5:30
रात्र शाळेतील शिक्षकांना काढलेले नाही. त्या शिक्षकांपैकी जे शिक्षक दोन नोक-या करीत होते. त्यांना एक नोकरी देण्यात आली. जे शिक्षक अर्धनोकरीत होते, त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली.
मुंबई - रात्र शाळेतील शिक्षकांना काढलेले नाही. त्या शिक्षकांपैकी जे शिक्षक दोन नोक-या करीत होते. त्यांना एक नोकरी देण्यात आली. जे शिक्षक अर्धनोकरीत होते, त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली. आमदार कपिल पाटील मात्र दोन नोकरी करणा-या शिक्षकांना कायम ठेवा आणि अर्धनोकरी करणा-या शिक्षकांना घरी पाठवा, असा आग्रह धरीत आहेत.
आतापर्यंत रात्रशाळा शिक्षकांसाठी यांनी काही केले नाही. मात्र रात्र शाळांच्या शिक्षकांच्या नोक-या टिकाव्यात आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने चांगली पध्दत आणली. त्यामुळे या शिक्षकांची दिवाळी अंधारात नाही. आ. कपिल पाटील यांना त्यांच्या स्वार्थापोटी शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसत आहे. त्यात त्यांचे हित आणि स्वार्थ आहे. सामान्य गरिबांचे हित त्यांना दिसत नाही. शिक्षकांची यंदाची दिवाळी आनंदात आणि प्रकाशमान झालेली आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
युनियन बँकेऐवजी शिक्षकांचे पगार मुंबई बँकेतून देण्यात येतात. मात्र आ.कपिल पाटील यांचे कोणाचेतरी लागेबांधे असल्यामुळे ते दुखावले गेले आहेत. शिक्षकांना गणपती आणि दिवाळी सणांच्या वेळी त्यांचा पगार मुंबई बँकेत वेळेत जमा झाला. ज्या शिक्षकांनी मुंबई बँकेत आपले खाते उघडले त्या शिक्षकांचा पगार सणाच्या आधी झाला. शिक्षकांचा पगार सणाच्या आधी खात्यावर जमा झाला असतानाही केवळ त्यांचे लागेबांधे असल्यामुळे एका विशिष्ट बँकेत शिक्षकांचा पगार जमा करण्याचा अट्टाहास ते कोणत्या स्वार्थापोटी करत आहेत हे कळत नाही, असा टोला ही तावडे यांनी मारला.
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांना आता प्रचारासाठी काहीच नाही. त्यामुळे काळे कंदील लावणे, स्वत:ला अटक करून घेणे ही शोबाजी करून ते शिक्षकांना भुलवू शकत नाहीत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. अनेक शिक्षकांच्या घरात व विद्यार्थ्यांच्या जीवनात आधीच्या सरकारच्या तुलनेत यंदाची दिवाळी आनंददायी व प्रकाशमान अशी आहे.
काळ्या कंदिलामुळे राज्यातील कोणत्याही शिक्षकांच्या दिवाळीला अपशकुन होणार नाही असे सांगतांना तावडे म्हणाले की, १४ इंग्रजी शाळांमधील मुले मराठी जिल्हा परिषद शाळेत येतात, शिक्षणामध्ये महाराष्ट्र १४व्या क्रमांकावरून तिस-या क्रमांकावर येतो, महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळा डिजिटल होत आहेत. त्यामुळे हे शिक्षण अंधारात जाण्याचे लक्षण नाही. केवळ राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक स्वत:चे हित साध्य करण्यासाठी शिक्षकांना खाईत लोटणा-यांना ही प्रगती दिसणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.