आदिवासी विद्यार्थ्यांना उलगुलानमध्ये नीटचे धडे; राज्यातील पहिला प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 04:46 PM2018-08-12T16:46:22+5:302018-08-12T16:47:31+5:30
कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणा-या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत.
- नरेंद्र जावरे
परतवाडा : कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणा-या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत.
धारणी प्रकल्प कार्यालय व पुणे येथील लिफ्ट इक्विपमेंट ही स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातला हा पहिला प्रयोग धारणी तालुक्यात राबविला जात आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, अकोला येथील तज्ज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून स्वखर्चाने बिजुधावडी येथे येऊन शिकवीत आहेत.
तत्कालीन प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांनी पुणे येथील लिफ्ट इक्विपमेंट या स्वयंसेवी संस्थेसोबत संवाद साधून मेळघाटातही आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे प्रशिक्षण द्यावे, यातून नीट आणि जेईईसारख्या कठीण अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणातून व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यांची प्रामाणिक तळमळ यशस्वी ठरली.
उलगुलानमध्ये घडतोय मेळघाटचा भावी डॉक्टर
मेळघाटच्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डॉक्टर नसल्याने आदिवासी रुग्णांसह बालकांना नाहक जीव गमवावा लागतो. तेव्हा मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांमधून डॉक्टर निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने बिजुधावडीच्या आश्रमशाळेत वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे धडे दिले जात आहेत. ९ सप्टेंबर २०१७ रोजी या प्रकल्पाचा मुहूर्त झाला. आठवड्यातील पशनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कक्षाला उलगुलान असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये परिसरातील राणीगाव, टेंभली, सुसर्दा, टेम्ब्रुसोंडा, बिजुधवडी या आश्रमशाळांमध्ये इयत्ता अकरावीत शिकणा?्या विज्ञान शाखेच्या प्रत्येकी दहा अशा एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर संस्थेच्या तज्ज्ञ मंडळीकडून येण्या-जाण्याच्या खर्चासकट कुठलाही न घेता मोफत नीट २०१९ वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे.
पुण्यात फडकला मेळघाटचा झेंडा
जानेवारी महिन्यात एका कार्यक्रमांमध्ये आश्रमशाळेतील शांतीलाल सावलकर या आदिवासी विद्याथ्यार्ने पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थितांपुढे इंग्रजीत भाषण करून सर्वांना अचंबित केले. सराव परीक्षेत 540 गुणांपैकी अनेक विद्यार्थ्यांनी ३०० गुण पटकाविले. बिजूधावडी आश्रमशाळेतील शिवकुमार रामलाल सावलकर या विद्याथ्यार्ने सराव परीक्षेत ३८० मिळविल्याने २०१९ च्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची योग्य दिशेने वाटचाल होत असल्याचा आत्मविश्वास प्रशिक्षक, प्रकल्प कार्यालयाने वर्तविला आहे. प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर, सुधीर चव्हाण, अतुल ढाकणे, संतोष, केतन, फारुख, परिमल, आकाश आदी सहकारी राज्यातला पहिला प्रयोग यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत. आदिवासी विभागामार्फत अमरावती येथे ४५ दिवसांसाठी विद्यार्थ्यांना संबंधित परीक्षेचा अभ्यासक्रम घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, परीक्षा कालावधीला वेळ आणि अमरावतीचे अंतर पाहता, बिजुधावडी येथील उलगुलानचा यशस्वी प्रयोग आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला आहे.
स्वतंत्र कक्षाची आवश्यकता
विद्यार्थी वैद्यकीय परीक्षापूर्व धडे आश्रमशाळेतील एका खोलीतच गिरवतात. त्यांना शांततापूर्ण वातावरण मिळण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी संबंधित लिफ्ट इक्विपमेंट व प्रकल्प कार्यालय प्रयत्नशील असल्याचे सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बिजुधावडी येथे आदिवासी प्रकल्प आणि लिफ्ट इक्विपमेंट या स्वयंसेवी संस्थेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेचे मोफत धडे दिले जात आहे. या उपक्रमातून अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. आता मेळघाटला त्यांच्या मातीतील डॉक्टर तयार होतील.
- शिवानंद पेढेकर, सहायक प्रकल्प अधिकारी,
आदिवासी प्रकल्प कार्यालय, धारणी