...तर स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करा- शिवसेना
By admin | Published: June 16, 2017 05:14 PM2017-06-16T17:14:44+5:302017-06-16T23:54:31+5:30
17 जुलै रोजी होणा-या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - 17 जुलै रोजी होणा-या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष स्वतःच्या उमेदवारावर जोर देत आहेत. त्याच वेळी शिवसेनेनंही नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत ही आमची पहिली पसंती आहे. तरीही भागवत यांच्या नावाला कोणाची अडचण असेल तर स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावं, ही आमची मनापासून इच्छा आहे, अशी भूमिका शिवसेनेनं स्पष्ट केली आहे.
कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्यांना पर्याय नसल्यास स्वामिनाथन यांना पर्याय माहिती आहेत का, त्यांना जर पर्याय माहिती असतील तर त्यांनाच राष्ट्रपती करावं, असंही शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. अमित शहा यांच्याकडे एखादं चांगलं नाव असेल तर त्याचा विचार करू, मात्र राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे 16 ते 18 जून दरम्यान तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की काय पण मित्रपक्ष शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न अमित शहा या दौऱ्यात करणार आहेत. ते रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाचे दर्शन शुक्रवारी घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांविरुद्ध सातत्याने टीका करीत असताना शहा हे कटुता कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
तर दिल्लीत भाजपा नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू केली असून, नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणी केली होती. त्यांनी आज तेलुगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशीही चर्चा केली आहे. वेंकय्या नायडू यांनी काल प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क साधून, आपणास शरद पवार यांना भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. पण पवार दिल्लीत नव्हते. त्यामुळे आज ते पवार यांच्याशी फोनवर बोलले. आपण दिल्लीत आल्यावर प्रत्यक्ष बोलू, असे पवार यांनी नायडू यांना सांगितले आहे. वेंकय्या नायडू यांनी चंद्राबाबू यांनाही चर्चेसाठी दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले होते. राष्ट्रपती निवडणुकीसाठी व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह सोनिया गांधींचीही भेट घेतली होती. सोनिया गांधीच्या 10 जनपथ रोडवरील निवासस्थानी व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह यांनी भेट घेतली आहे.