" कृत्रिम पाऊस" ठरू शकतो दुष्काळात शेतकऱ्यांचा तारणहार...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:52 PM2019-05-10T13:52:02+5:302019-05-10T14:14:22+5:30
महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफ चा अंदाज व्यक्त केला आहे़.
विवेक भुसे
पुणे : महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफ चा अंदाज व्यक्त केला आहे़. आताच दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात या मॉन्सूनमध्येही पाऊस कमी झाला तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़. त्यामुळे कृत्रिम पावसासाठी आतापासून राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले तर प्रत्यक्ष पावसाळ्यात त्याचा फायदा होऊ शकेल़.
साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम (सॅसकॉफ) यांची काठमांडु येथे नुकतीच परिषद झाली़. त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भाग येथे सरासरीपेक्षा जवळपास ४० टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे़. चार महिन्यासाठीचा हा अंदाज व्यक्त केला आहे़.
क्लायपॅक या संस्थेने केलेल्या अभ्यासात ढगांमधील बाष्पकण एकत्र करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने प्रयत्न केल्यास जास्त पाऊस मिळू शकतो़. याबाबत क्लायपॅकचे प्रकल्प संचालक डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, या प्रकल्पावर आम्ही ३ वर्षे अभ्यास केला़. ढगांचे निरीक्षण करुन पाऊस कमी पाडतो, याचे निरीक्षण नोंदविले़. २०१७ मध्ये कर्नाटक सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला होता़. त्याला आम्ही मार्गदर्शन केले होते़. कर्नाटकमध्ये दर ५ किमीवर पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत़. वर्षाधारे या प्रकल्पात जेव्हा ढगांवर फवारणी केली़. त्यानंतर पुढच्या १५ मिनिटात ते ढग ज्या दिशेने केले़. त्या ठिकाणच्या पावसात वाढ झाल्याचे दिसून आले़ त्याचवेळी ज्या ढगांवर फवारणी केली नाही़. त्यातून मिळालेला पाऊस याची तुलना केली तर त्या प्रयोगात २९ टक्के पावसात वाढ झाल्याचे दिसून आले़.
कर्नाटकने ३ रडार, २ विमाने भाड्याने घेतली होती़. त्यासाठी साधारण ३० कोटी रुपयांचा खर्च आला होता़. रडार असेल तर हा खर्च खूप कमी होतो़. या खर्चाच्या मानाने दुष्काळी भागात तब्बल २़१ टीएमसी अधिक पाणी उपलब्ध झाले होते़. (खडकवासला धरणापेक्षा अधिक पाणी) त्याचवेळी या पावसाने खंड काळात पिके वाचल्याने झालेल्या फायद्याचा विचार केल्यास तो कितीतरी पट आहे़.
कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी करण्यास काही कालावधी लागतो़. रडार , विमाने परदेशातून आणावी लागतात़ त्यामुळे जून, जुलैमध्ये पाऊस कमी पडल्यानंतर हालचाली सुरु केल्यास प्रत्यक्षात प्रयोग सुरु होण्यास ऑगस्ट उजाडतो़. त्यावेळी आकाशात आवश्यक ढग नसेल तर त्याचा उपयोग होत नाही़.
सुदैवाने पाऊस जास्त झाला तरी पावसाळ्यात अनेकदा खंड येतो़. विशेषत: जुलैमध्ये पावसात नेहमी खंड पडून पेरणी वाया जाते़. या काळात जर कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास व त्यातून थोडा जरी पाऊस मिळाला तरी पिके जगविता येतील़. जमिनीतील ओलावा कायम ठेवणे शक्य होऊ शकते़ त्यादृष्टीने कृत्रिम पावसाचे अधिक महत्व आहे़.