एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच, सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार संप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 01:37 AM2017-10-19T01:37:13+5:302017-10-19T01:57:27+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन मंत्र्यांसोबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन मंत्र्यांसोबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळसणात सलग तिसऱ्या दिवशी सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत.
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बुधवारी सकाळी तोडगा निघणे अपेक्षित होते. मात्र परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नव्हते. अखेर रावते संध्याकाळी ५ वाजता मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात पोहोचल्यावर बैठकीस सुरुवात झाली. यावेळी कामगार संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यालयाच्या कॉन्फरन्स सभागृहात चर्चेसाठी उपस्थित होते.
सायंकाळी ७ च्यासुमारास एसटी प्रशासन आणि कामगार संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात बैठकीला सुरुवात झाली. सातव्या वेतन आयोगाची मागणी मागे घेतल्याशिवाय संपावर तोडगा निघणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यास नकार दिला. त्यामुळे मध्यरात्री 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत चाललेल्या बैठकीत संपावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी संप कायम राहणार आहे.
"एसटी कामगारांच्या संपावर बैठकीत अद्याप तोडगा निघाला नाही .आम्ही सातवा वेतन आणि सेवाज्ये ष्ठतेची मागणी केली. यासाठी साडे चार हजार कोटींची मागणी प्रशासनाकडे केली. यात सातव्या वेतन आयोगाला मिळताजुळता प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. यामध्ये 4 ते 7 हजारांची वेतनवाढीचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला. मात्र, त्यातील वाढ कामगारांना मान्य होणार नसल्याने अद्याप सकारात्मक तोडगा निघू शकलेला नाही. उद्या परिवहनमंत्र्याच्या बैठकीत पुन्हा चर्चा करून यावर तोडगा काढून एस टी कर्मचारी संघटना संप मागे घेण्याच्या तयारीत आम्ही आहोत," असे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.
तर "एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पगार वाढ देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यामध्ये 2.57 हजार कोटींचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. मात्र यापुढेसरकारकडून एक रुपयासुद्धा वाढवून दिला जाणार नाही. आता एसटी कर्मचारी संघटना का अडून बसली आहे, हे माहित नाही. मात्र यापुढे कोणताही तोडगा निघणार नसून त्यांनी संप मागे घ्यावा, असे मला वाटते."असे परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले.