पुण्यात दुधाची कमतरता भासणार, चितळेंचे दूध संकलन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 02:36 PM2018-07-17T14:36:24+5:302018-07-17T14:36:59+5:30
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले आहे.
पुणे : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा फारचा परिणाम जाणवला नसला तरी, दुसऱ्या दिवशी दुधाचा काहीसा तुटवडा जाणवू लागला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक चितळे डेअरीतर्फेही दुधाचे संकलन गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. याबाबातची माहिती चितळे दूध डेअरीचे गिरीश चितळे यांनी दिली. याचबरोबर, ते म्हणाले, दूध संकलन करण्यासंदर्भात आज सांयकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, पुणे शहरात आणि आजूबाजूच्या भागात चितळेंच्या दूधाची विक्री होते. मात्र दूध संकलन बंद झाल्यामुळे नागरिकांना चितळेंचे दूध खरेदीसाठी उपलब्ध होणार नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सोमवारी प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने, लाखो लीटर दुधाचे संकलन झाले नाही. लाखो लीटर दूध पडून राहिल्याने शेतक-यांचे ३५ कोटींहून अधिक नुकसान झाले. आंदोलनावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न पहिल्या दिवशी अयशस्वी ठरला. आंदोलन चिघळल्यास शहरांमध्ये दुधाचा तुटवडा जाणवू शकतो.