चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 10:16 AM2017-12-31T10:16:26+5:302017-12-31T10:16:38+5:30
पुणे : नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीनच पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.
पुणे : नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीनच पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या एटीएम सेंटरला सुरक्षारक्षक नव्हते.
या प्रकरणी हिताची सर्व्हिसेस या कंपनीचे चॅनल मॅनेजर देविदास अय्यर (वय ४५, रा. वारजे माळवाडी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील खडी मशीन चौकातून दिवसरात्र वाहतूक असते. अशा अहोरात्र वाहतूक असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील बधेनगरमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे एटीएम सेंटर केवळ एक महिन्यापूर्वीच सुरू झाले आहे. या एटीएम सेंटरमध्ये शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. एटीएम मशीनची वायर कापली व कशाच्या तरी सहाय्याने एटीएम मशीन उचकटून ती मशीनच चोरुन नेली. या एटीएममध्ये ४ लाख ५४ हजार ९०० रुपये होते. याच इमारतीत राहणारे एटीएम असलेल्या दुकानाच्या मालकाना सकाळी सहाच्या सुमारास एटीएम फोडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यात या एटीएम सेंटरमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले.
एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही लावलेले असतात. अनेक ठिकाणी केवळ एटीएम मशीनवरच फक्त कॅमेरा असतो. या ठिकाणी तुम्ही पैसे काढले तरच मशीनमधील कॅमेरा फोटो काढतो. आता एटीएम मशीनच चोरुन नेल्याने व तेथे सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचे चित्रीकरण मिळू शकलेले नाही. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे अधिक तपास करीत आहेत.