सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात तृतीय
By admin | Published: March 4, 2015 11:59 PM2015-03-04T23:59:09+5:302015-03-04T23:59:09+5:30
यशवंतराज अभियान : देवगड पंचायत समिती विभाग स्तरावर प्रथम
सिंधुदुर्गनगरी : यशवंत पंचायत राज अभियान सन २०१३-१४ मध्ये केलेल्या कामाच्या मूल्यमापनात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळाला आहे, तर पंचायत समिती देवगडने राज्यस्तरावर द्वितीय व विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मंगळवारी मंत्रालयात शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचा निकाल जाहीर केला.
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांनी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरांवर यशवंत पंचायत राज अभियान ही अभिनव पुरस्कार योजना राबविण्यात आली. राज्यातील अत्युत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा, तीन पंचायत समित्या व तीन ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी राज्यस्तरावर निवड करण्यात येते. तसेच विभागस्तरावर तीन ग्रामपंचायती व तीन पंचायत समित्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
ही निवड करण्यासाठी तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर, विभागस्तरावर आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करून या समितीमार्फत निवड केली जाते. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. यासाठी दहा लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक आहे. राज्यस्तरावर देवगड पंचायत समितीने द्वितीय क्रमांक पटकावला असून, यासाठी १२ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. राज्यस्तरावर वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला असून, यासाठी एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विभागस्तरावर झालेल्या मूल्यमापनात कोकण विभागात देवगड पंचायत समिती प्रथम (दहा लाख), मालवण पंचायत समिती द्वितीय (सात लाख), वेंगुर्ला पंचायत समिती तृतीय (पाच लाख) आणि स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच विभागस्तरावर ग्रामपंचायतीच्या झालेल्या मूल्यमापनात परुळेबाजार (वेंगुर्ला) ग्रामपंचायत आणि रायगड जिल्ह्यातील चांदोरे ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी अडीच लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. (प्रतिनिधी)
देवगड पंचायत समितीची हॅट्ट्रिक
देवगड पंचायत समितीने मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामकाजाच्या जोरावर यशवंत पंचायत राज अभियानामध्ये राज्यस्तरावर द्वितीय व विभागस्तरावर सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या यशात तत्कालीन सभापती सदानंद देसाई, उपसभापती अनघा राणे, सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण व पंचायत समिती कर्मचारी यांचा सहभाग आहे.