बी.कॉमच्या विद्यार्थ्यांचे तीस मार्कांचे नुकसान
By admin | Published: May 13, 2014 03:40 AM2014-05-13T03:40:32+5:302014-05-13T03:40:32+5:30
टीवाय बी.कॉमच्या अकाउंटिंग फायनान्स स्पेशलच्या ^‘आॅडिट अॅण्ड फायनान्स’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाल्याने त्याचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला.
पनवेल : टीवाय बी.कॉमच्या अकाउंटिंग फायनान्स स्पेशलच्या ^‘आॅडिट अॅण्ड फायनान्स’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाल्याने त्याचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. नवीन पनवेल येथील पिल्लई महाविद्यालयातील एका परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका दुरुस्तीबाबत सूचना न आल्याने परीक्षार्थींचे एकूण ३० मार्कांचे नुकसान झाले आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासन आणि विद्यापीठाकडून हात झटकले जात असून, विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या पिल्लई महाविद्यालयात सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यामध्ये वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाचे पेपर सुरू आहेत. शनिवारी आॅडिट अॅण्ड फायनान्सचा ११ ते १ या कालावधीत पेपर सुरू होता. परंतु या विषयाचा प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्न चुकीचे असल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. काहींनी पर्यवेक्षकांकडे याबाबत तक्रारही केली. त्यानुसार विद्यापीठाला कळविण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाने या दोन प्रश्नांमध्ये दुरुस्ती करून त्याबाबत संबंधित महाविद्यालयाला कळविले. त्यानुसार पिल्लई महाविद्यालयात फॅक्स आला. परंतु तो उशिरा आल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. याबाबत परीक्षाप्रमुखांनी लेखी सूचनाही पाठवली. परंतु एका हॉलमध्ये पर्यवेक्षकाने ही सूचना परीक्षार्थींना वाचून न दाखवता ते पत्रक तसेच सही करून पाठवून दिले. त्यामुळे या हॉलमध्ये पेपर सोडवत असलेल्या विद्यार्थ्यांना दुरुस्ती किंवा पर्यायी प्रश्नाबाबत माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे दोन्ही प्रश्न चुकले असून त्यामध्ये विद्यापीठ, महाविद्यालय, संबंधित पर्यवेक्षक जबाबदार असल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे. पेपर संपल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना इतरांकडून या प्रश्नांची दुरुस्ती विद्यापीठाकडून आल्याचे समजले. विद्यार्थ्यांनी याबाबत प्राचार्य कुट्टी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गांभीर्याने निर्णय न घेता केवळ टाळाटाळ केली. यामुळे पालकवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)