बोनसचे ९६ लाख लुटणाऱ्या एपीआयसह चौघांना तीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:35 PM2018-09-04T16:35:12+5:302018-09-04T20:08:32+5:30
या प्रकरणाने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे़.
पुणे : मांजरी येथील गंधर्व रेसिडेन्सी येथे वासन आय केअर हॉस्प्लिटलची ९६ लाख रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयाने हडपसर पोलिस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीधर नकुल यादव, पोलिस कर्मचारी गणेश मोरे, पोलीस मित्र अविनाश देवकर आणि रविंद्र सोपान माने या चौघांना ३ वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली़ सत्र न्यायाधीश ए़ एस़ भैसारे यांनी हा निकाल दिला़. या प्रकरणाने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे़.ही घटना नोव्हेंबर २०१५ मध्ये मांजरी येथील गंधर्व रेसिडेन्सी येथे घडली होती़
या प्रकरणी मोटारचालक विशाल देवीदास भेंडे (वय ३३, रा़ पांडवनगर) यांनी फिर्याद दिली होती़. विशाल भेंडे हे कोथरूड येथील हॉस्पिटलमध्ये चालक म्हणुन करीत होते. वासन आय केअरच्या पुण्यात कोथरूड, सदाशिव पेठ आणि मगरपट्टा येथे शाखा आहेत. मोटारचालक विशाल धेंडे हे हॉस्पिटलची रोकड मगरपट्टा येथे घेवुन गेले होते. वासन आय केअर हॉस्पिटलचे डॉ़ ठाकूर यांनी रुग्णालयातील कर्मचाºयांना बोनस देण्यासाठी बँकेतून काढलेले ६० लाख व रुग्णालयाच्या वेगवेगळ्या केंद्रातून जमा झालेले ३६ लाख रुपये असे ९६ लाख रुपये मोटारीत ठेवले व गंधर्व हॉटेलमध्ये जेवायला गेले होते़ सहायक पोलीस निरीक्षक यादव व त्यांचे सहकारी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले़ त्यांनी मोटारीतील पैशांबाबत विचार करुन धेंडे यांना मारहाण केली़. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेले़ .मोटारीत हत्यार सापडल्याचे सांगून उलट सुलट चौकशी सुरु केली़ पहाटे चारला ९६ लाख रुपये घेऊन चालक व त्यांच्या सोबत असलेल्या इतरांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आले़. त्यांनी हे पैसे घेतले़. रुग्णालयाच्या इतर अधिकाऱ्याना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याना याची माहिती दिली़. यावेळी केलेल्या तपासात सहायक निरीक्षक यादव व इतरांनी ९६ लाख रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती़ त्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल होऊन चौघांनाही अटक करण्यात आली होती़
प्रारंभी हा खटला लष्कर येथील न्यायालयात यादव व इतरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती़ त्याविरुद्ध शासनाने सत्र न्यायालयात अपील केले़ सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी यात युक्तीवाद केले़ तो मान्य करुन सत्र न्यायालयाने सहाय्यक निरीक्षक गिरीधर यादव, पोलिस कर्मचारी गणेश मोरे तसेच अविनाश देवकर आणि रविंद्र सोपान माने यांना ३ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़