लालबागच्या राजाच्या प्रभावळीवर यंदा कासवाची आरास, बाप्पाच्या प्रथम मुखदर्शनासाठी भक्तांची गर्दी
By बाळकृष्ण परब | Published: August 21, 2017 11:43 PM2017-08-21T23:43:03+5:302017-08-22T09:19:53+5:30
मुंबई, दि. 21 - मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे सोमवारी प्रथम मुखदर्शन झाले. सोमवारी संध्याकाळी ...
मुंबई, दि. 21 - मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे सोमवारी प्रथम मुखदर्शन झाले. सोमवारी संध्याकाळी लालबागच्या राजाच्या मंडपात प्रसारमाध्यमांसह गणेशभक्तांसाठी बाप्पांचे प्रथम दर्शन झाले. सालाबादप्रमाणे लालबागच्या राजाच्या मंडपात लक्षवेधी आणि भव्य आरास करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या सिंहासनावर चक्क कासवाची आरास करण्यात आली आहे.
लालबागच्या राजाची गणेशमूर्ती ही दरवर्षी सारखीच ठेवण्यात येत असली तरी त्याच्या सिंहासनामध्ये दरवर्षी बदल करण्यात येत असतात. त्यामध्ये बाप्पाची प्रभावळ वैशिष्टपूर्ण ठेवण्याकडे कल असतो. गतवर्षी बाप्पांच्या प्रभावळीवर घुबडाला स्थान देण्यात आले होते. बाप्पांच्या मखरावर अशुभ मानल्या जाणाऱ्या घुबडाल प्रभावळीवर स्थान देण्यात आल्याने त्यावर टीका झाली होती. मात्र राजाच्या प्रभावळीवरील घुबडाची गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात फार चर्चा झाली होती.
दरम्यान, यावर्षीच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या सिंहासनाची सजावट कशी असेल, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. सोमवारी रात्री झालेल्या प्रथम मुखदर्शन सोहळ्यात बाप्पांच्या सिंहासनावरील कासवांची आरास पाहून भक्त चकीत झाले. या आराशीमध्ये बाप्पांच्या प्रभावळीवर पूर्णपणे कासवाचे चित्र आहे. तर आसनाच्या चारही खुरांवरही कासवांच्या मूर्ती आहेत.
अधिक वाचा
लालबागच्या राजाला अकोल्याचे जानव
VIDEO - लाखोंच्या अलंकारांनी नटणार बाप्पा !
तयारी गणेशोत्सवाची : खरेदीसाठी ग्रामस्थांची लगबग, सासवडला गणेशमूर्तीवर अखेरचा हात....
चतुर्थीच्या दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. तसेच लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत असतात. .या मंडळाने महारक्तदान शिबीर आयोजित केले होते. या महारक्तदान शिबिरात १११०० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या होत्या. या रक्तपिशव्यांपैकी १००० ते १२०० रक्तपिशव्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी विमानाने पाठविण्यात आल्या असून राज्यातील नागपूर व औरंगाबाद या भागातील काही दुर्गम भागात देखील या रक्तपिशव्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली होती.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरतात. राज्यातील तसेच देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी मुंबईत येतात. अशावेळी मोठ्या प्रमाणात भासणारी रक्ताची गरज भागविण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळामार्फत ६ ऑगस्ट रोजी लालबाग परिसरात स्वैछिक रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.