कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 05:37 PM2018-02-07T17:37:48+5:302018-02-07T17:58:02+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे. नाशिक महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यापुढे कार्यरत असतील. तर नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पुण्यात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि संचालकीय व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली होती. मुंढे यांच्या जागी नयना गुंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचीही बदली करण्यात आली असून त्यांची मुंबईत मंत्रालयात नेमणूक करण्यात आली आहे.
मुंढे यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारल्यापासून बेशिस्त कर्मचा-यांवर कारवाई सुरू केली होती, तसेच ‘पीएमपी’च्या कारभारातील ‘राजकीय’ हस्तक्षेप पूर्णपणे बंद केला होता. त्यामुळे मुंढे यांना हटविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे दोन्ही पालिकांतील पदाधिका-यांशी खटके उडाले होते. लोकप्रतिनिधींना सन्मानाने वागणूक देत नसल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. सर्वसाधारण सभांमध्ये अनेक नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुंढे यांच्या बदलीसाठी अनेकांनी साकडे घातले होते. अखेर त्यांची नाशिकचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
त्यापूर्वी नवी मुंबईत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. राजकीय वातावरण तापल्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली पुण्यात करण्यात आली होती.