दोन समलिंगी तरुणींचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: September 1, 2016 04:07 AM2016-09-01T04:07:37+5:302016-09-01T04:07:37+5:30
समलिंगी संबंधाला कुटुंबीयांकडून विरोध असल्याने एकाच परिसरात राहणाऱ्या दोन तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी चेंबूरमध्ये घडली.
मुंबई : समलिंगी संबंधाला कुटुंबीयांकडून विरोध असल्याने एकाच परिसरात राहणाऱ्या दोन तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी चेंबूरमध्ये घडली. निशा (२१) आणि आशा (२१) (नाव बदललेले) अशी त्यांची नावे असून, यातील एका तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करत येथील शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह दोघांना अटक केली.
चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात या दोघींचे कुटुंब वास्तव्य करत आहे. मागील अनेक वर्षांपासून या दोघींची मैत्री आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ही बाब निशाच्या कुटुंबीयांना रहिवाशांनी सांगितली. २७ आॅगस्टला या दोघी मरिन ड्राइव्ह येथे फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्या रात्री घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत जाब विचारल्यावर निशाने घरातील कीटकनाशक द्रव्याद्वारे आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर त्यांनी आशाच्या मोठ्या बहिणीला फोन करून घरी बोलावले. या वेळी आशाही बहिणीसोबत तेथे गेली होती. येथे हजर स्थानिक शिवसेना शाखाप्रमुखासह निशाच्या वडिलांनी आशाला शिवीगाळ केली. यावर रागाने घरी आलेल्या आशाने रविवारी पोटमाळ्यावर दोरीने गळफास घेतला. तिच्या कुटुंबीयांना ही बाब समजताच त्यांनी चुनाभट्टी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनास राजावाडी रुग्णालयात पाठवला. तर आशाच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी निशाचे वडील आणि शाखाप्रमुखाला अटक केली आहे. (प्रतिनिधी)