ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 08:45 PM2018-02-15T20:45:55+5:302018-02-15T21:50:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी नाणार ग्रामस्थांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये नाणार ग्रामस्थांचाही समावेश होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ७६ टक्के प्रकल्पग्रस्तांची असंमत्तीपत्रे मुख्यमंत्र्यांना सादर केली. त्यानंतर ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये नाणार प्रकल्पाबाबतच्या एमओयूवर स्वाक्षऱ्या होणार नाहीत, अशी माहिती दिली.
रिफायनरी प्रकल्प नको असल्याबाबतची असंमत्तीपत्रे भरून मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील, हे शिवसेनेने आधीच जाहीर केले होते. त्यानुसार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, आमदार वैभव नाईक तसेच स्थानिक समितीचे भाई सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आपण ७६ टक्के प्रकल्पग्रस्तांची असंमत्तीपत्रे सोबत आणली असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. ही असंमत्तीपत्रे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली. त्याची पडताळणी केली जाईल आणि जर स्थानिकांना हा प्रकल्प नको असेल तर तो रद्द केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नाणार, सागवे परिसरातील १४ गावांमधून प्रकल्पाबाबतची नाराजी वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातूनही या प्रकल्पाबाबतचा विरोध वाढत आहे. आम्हाला प्रकल्प नकोच, अशी भूमिका दोन्ही जिल्ह्यातील स्थानिकांनी घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनेही रिफायनरीला तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे.
उत्सुकता वाढली
गेल्या पाच ते सहा महिन्यातच रिफायनरी प्रकल्पाचा विरोध तीव्र झाला आहे. शिवसेनेने गेल्या तीन महिन्यात लोकांना पाठिंबा देत आपलाही विरोध असल्याचे जाहीर केले आहे. आता या प्रकल्पाचे नेमके काय होणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
रद्द होईल, असा विश्वास आहे
स्थानिकांची असंमत्तीपत्रे पाहता हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असा आपल्याला विश्वास वाटत असल्याचे ही बैठक संपल्यानंतर आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा
दरम्यान, नाणार प्रकल्पाबाबत चर्चा करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. मात्र राज्यातील राजकारण आणि आगामी निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.