हे तर चहाच्या पेल्यातील वादळ, मोदींच्या मुलाखतीची उद्धव ठाकरेंकडून खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 08:56 AM2019-01-03T08:56:27+5:302019-01-03T08:59:22+5:30
भाजपाचा मित्रपक्ष आणि केंद्र आणि राज्याच्या सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेने पंतप्रधानांच्या या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय या दिलेली मुलाखत सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र भाजपाचा मित्रपक्ष आणि केंद्र आणि राज्याच्या सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेने पंतप्रधानांच्या या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनातील अग्रलेखामधून लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जोरकस मुलाखत एकाच वृत्तवाहिनीला दिली आहे. मुलाखत मोजून 95 मिनिटांची असल्याचे बोलले जाते. पंतप्रधानांची मुलाखत मोठय़ा कालखंडाने येत असल्याने ‘चर्चा तर होणारच.’ तशी चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत मोदी अनेक विषयावर बोलले, असा प्रचार सुरू आहे. मात्र तो चुकीचा आहे. पण त्यातून जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली का? असा सवाल सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या प्रश्नाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राममंदिरासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह शिवसेनेची होती. मोदी यांनी ती साफ ठोकरून लावली आहे. काही झाले तरी अध्यादेश काढणार नाही. राममंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल. असे मोदींनी म्हटले आहे. गेल्या चार पाच वर्षांत ते पहिल्यांदाच खरे बोलले आहेत. राम मंदिर त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नाही. रामाच्या नावावर सत्ता मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात राममंदिर होणार नसेल तर कधी होणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
राम मंदिराच्या मागणीसाठी शेकडो कारसेवक मारले गेले, हिंदूंचा नरसंहार झाला. दंगली झाल्या. न्यायालयांच्या प्रक्रियेतून राममंदिराचा निर्णय घ्यायचा होता मग हा रक्तपात आणि नरसंहार घडवला कशासाठी? अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली.
तसेच नोटाबंदी, पाकिस्तान, परदेशातील काळा पैसा या प्रश्नांवर मोदींनी दिलेल्या उत्तरांवरही सामनातील अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. एकंदरीत पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले. पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले व मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती. 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, देहबोलीत स्पष्टपणे दिसत होती. हेच सत्य आहे, असा टोलाही सामनातील अग्रलेखातून लगावण्यात आला.