उध्दव ठाकरेंनी नितेश राणेंचे ऐकले; नाणार आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 08:16 PM2019-12-02T20:16:57+5:302019-12-02T20:17:26+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली होती.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली होती. यानंतर आज आरे जंगलातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील नोंदविलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.
उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार पदभार स्विकारल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मुंबईत जन्मलेला,वाढलेला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मीच आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी काही वेगळं करता येईल का, याबाबत मी विचारधीन आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितले होते. तसेच काल त्यांनी आरे आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.