बीटीच्या ३५ लाख पाकिटांची विनापरवाना विक्री, तणनाशक तंत्रज्ञानाचा अवैध वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 07:00 PM2017-11-03T19:00:35+5:302017-11-03T19:01:19+5:30
राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत तणनाशक निरोधक बी.टी. बियाण्याची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकली गेली आहेत..
अमरावती : राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत तणनाशक निरोधक बी.टी. बियाण्याची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकली गेली आहेत. तणनाशक तंत्रज्ञानाचा विनापरवानगीने वापर करण्यात आल्यानेच शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करून शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाला घरचा आहेर दिला आहे.
मोन्सँटो कंपनीचे तणनाशक निरोधक (राऊंडअप बी.टी.) तंत्रज्ञानाचा विनापरवानगी वापर करून देशभरात ४७२ कोटी रुपयांच्या ३५ लाख पाकिटांची विक्री झाली व या बियाण्याचा वापर करून सुमारे साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली, असे अतिशय धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्यामुळे तणनाशक निरोधक बी.टी. बियाणे आलेच कसे, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली.
केंद्राची जेनेटिक इंजिनीअरिंग अपरायजल कमिटी , भारत सरकारची कृषी संशोधन परिषद व कापूस संशोधन संस्थेची तसेच कृषी विद्यापीठाची अवैध बियाणे रोखण्याची जबाबदारी आहे. अशा बियाण्यांना परवानगी देण्यासाठी कायदे, नियम आहेत. केंद्रीय कापूस अनुसंधान परिषद, कृषी परिषदेसह विविध संस्थांचे अशा बियाण्यांवर नियंत्रण असते. त्यांच्या मान्यतेविना असे बियाणे देशात येतच नाहीत. अशा स्थितीत हे बियाणे आलेच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण देशात हा गोरखधंदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या हातमिळवणीमुळेच चालत असावा, असा आरोपही तिवारी यांनी केला.
सरकारी यंत्रणांचे हितसंबधच कारणीभूत
गेल्या दोन-तीन वर्षांपासून तणनाशक निरोधक राऊंडउप बी.टी. बियाण्यांचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम शेतकºयांचे आरोग्य आणि जमिनीवर होत आहे. पेरणी झालेल्या परिसरात कॅन्सर, किडनीचे आजार बळावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद आहे. तंत्रज्ञान लीक होत नाही. सरकारच्या विविध संस्थांचे बियाणे, खत व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांशी हितसंबंध यात गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तिवारी यांनी सांगितले.