केंद्रीय मंत्रिमंडळात अडसूळ यांचा समावेश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2015 03:02 AM2015-04-20T03:02:12+5:302015-04-20T03:02:12+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून खासदार आनंदराव अडसूळ यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील स्पष्ट संकेत सहकार व पणनमंत्री
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून खासदार आनंदराव अडसूळ यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील स्पष्ट संकेत सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या नात्याचा यासाठी प्रसंगी वापर आपण करू, अशी ग्वाहीच चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिली.
राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियन या संघटनेच्या ५५व्या वर्धापन सोहळ्यात त्यांनी हे संकेत दिले. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी हा सोहळा पार पडला. को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियनचे गेली ३० वर्षे समर्थपणे धुरा सांभाळून सहकार चळवळीलाही हातभार लावल्याबद्दल आनंदराव अडसूळ यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने, युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आनंदराव अडसूळ म्हणाले, सहकार क्षेत्रावर आधीच प्राप्तिकराचा बोजा लादला गेला आहे. आता सभासदांवर टीडीएस कापले जाण्याचा जाच यंदाच्या अर्थसंकल्पाने लादला आहे. प्राप्तिकर आणि यंदाच्या अर्थसंकल्पातील टीडीएस वसुलीच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आग्रह धरू, असे चंद्रकांत पाटील यांनी या वेळेस बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)