व्हॅलेंटाइन डे : सोशल मीडियामुळे भेटकार्ड कालबाह्य

By admin | Published: February 10, 2017 04:10 AM2017-02-10T04:10:07+5:302017-02-10T04:10:07+5:30

व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. हा प्रेम दिन सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून गिफ्ट शॉप्स, मॉल्स लाल रंगाच्या भेटवस्तूंनी अक्षरश: सजली आहे

Valentine's day: Gift Card expired due to social media | व्हॅलेंटाइन डे : सोशल मीडियामुळे भेटकार्ड कालबाह्य

व्हॅलेंटाइन डे : सोशल मीडियामुळे भेटकार्ड कालबाह्य

Next

प्रज्ञा म्हात्रे , ठाणे
व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. हा प्रेम दिन सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून गिफ्ट शॉप्स, मॉल्स लाल रंगाच्या भेटवस्तूंनी अक्षरश: सजली आहे. बाजारपेठेत व्हॅलेंटाइन डे गिफ्टची खच्चून गर्दी असली तरी त्या प्रमाणात त्याचा खप नाही. सोशल मीडियामुळे भेटकार्डांची क्रेझ ओसरत असल्याची खंत दुकान मालकांनी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत या भेटवस्तूंची विक्री होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
व्हॅलेंटाइन डे बाबत तरुणाईमध्ये आगळीच उत्सुकता असते. तरुणतरुणी एकमेकांना भेटवस्तू आणि भेटकार्ड देतात. यंदा या भेटवस्तूंमध्ये विशेष नावीन्य पाहायला मिळत नाही. त्याचत्याच भेटवस्तू पुन:पुन्हा बाजारात येत आहेत. भेटवस्तूंच्या दुकानाचे मालक सुशील गाला म्हणाले की, पूर्वी मोठ्या प्रमाणात भेटवस्तूंची व भेटकार्डांची खरेदी होत असे. त्यामुळे नवनवीन भेटवस्तू बाजारात येत होत्या. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून ते आपल्या शुभेच्छा देतात. सध्या आॅनलाइन शॉपिंगकडे कल असल्याने दुकाने, शोरूममध्ये जाऊन महागड्या भेटवस्तू खरेदी करण्याकडे तरुणाईचा कल नाही. एखादी किचेन किंवा परफ्युम यापलीकडे दुकानांतून भेटवस्तूंची खरेदी होत नाही. मध्यम वयाची म्हणजेच लग्न झालेली जोडपी काही प्रमाणात महागड्या भेटवस्तूंची खरेदी करतात, असे निरीक्षण गाला यांनी नोंदवले. छोट्या भेटवस्तूंना तरुणाईची मिळणारी पसंती पाहता कमी किमतीच्या भेटवस्तू बाजारात विक्रेत्यांनी आणल्या आहेत. अगदी ५० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू बाजारात उपलब्ध आहेत. भेटवस्तूंमध्ये परफ्युम्स, घड्याळे, चॉकलेट, बुके, ज्वेलरी यांचा समावेश असलेले बास्केट तयार केले जाते. गिफ्ट शॉप्समध्ये चॉकलेट बुके, मेसेज बॉटल्स, हार्ट शेपचे घड्याळ, कपल्स डुम, वाइन ग्लास, गोल्डन/सिल्व्हर हॉर्ट, कपल मग, स्वानचे शोपीस, लॅम्प कपल, पिलो, कपल टेडी बास्केट अशा विविध भेटवस्तू पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियाचा प्रभाव नव्हता, त्या वेळी आपल्या भावना भेटकार्ड देऊन व्यक्त केल्या जात होत्या. दरवर्षी या भेटकार्ड खरेदीत जवळपास २५ टक्क्यांनी घट होत असल्याचे गाला यांनी सांगितले.


खरंतर, या दिवसामध्ये उत्साह राहिलेलाच नाही. त्यामुळे हा दिवस साजरा करावा, असे मला तर मुळीच वाटत नाही. आपला व्हॅलेंटाइन हा आपला प्रियकर असाच गैरसमज पसरलेला आहे. या दिवशी ते गुलाबाचे फुल किंवा चॉकलेट आपण आपल्या प्रिय आईवडिलांनाही देऊन व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकतो.
- रितीक्षा जगताप

हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आहे. गर्लफ्रेण्ड - बॉयफ्रेण्डमधले प्रेम म्हणजे हा दिवस वाटत आहे. प्रेम हे कुठल्याही दोन व्यक्तींमधील असू शकते. दोन मैत्रिणींमधले, मित्रांमधले, भाऊबहिणीतले असू शकते.
- श्रद्धा गायकवाड

काळानुरूप प्रेमाचे चेहरे बदलतात, प्रेम मात्र तेच असते. पूर्वी गजरा देऊन व्यक्त केले जाणारे प्रेम, आज चॉकलेट देऊन व्यक्त केले जात असेल, तर फक्त भेटवस्तू बदलली आहे, भावना तीच आहे. आज फक्त बदललाय प्रेमामधला विश्वास... सोशल मीडियामुळे प्रेमिक इतके जवळजवळ आले आहेत की, दोघांना वेगळा श्वास घ्यायला उसंत नाही आणि याचमुळे संशयनामक कीड नात्याला लागत आहे. दिवसागणिकशेकडो काडीमोड धक्कादायकपणे घडताना आपण पाहत आहोत. - आदित्य दवणे

Web Title: Valentine's day: Gift Card expired due to social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.