वंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 08:22 PM2019-01-21T20:22:15+5:302019-01-21T20:22:20+5:30

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात माजी मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढणार असल्यास त्यांना वंचित बहुजन आघाडीचे समर्थन राहील.

Vanchit Bahujan Aghadi will give Support to Chhagan Bhujbal | वंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन

वंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन

Next

अकोला : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात माजी मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढणार असल्यास त्यांना वंचित बहुजन आघाडीचे समर्थन राहील. ते रिंगणात नसल्यास वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मैदानात उतरणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी आमदार हरिदास भदे यांनी येथे सांगितले. सोबतच लोकसभा निवडणुकीबाबत २३ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीची भूमिकाही स्पष्ट केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. 

शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अ‍ॅड. संतोष रहाटे, दीपक गवई, डॉ. प्रसन्नजित गवई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची भेट झाली. यावेळी माजी आमदार हरिदास भदे, अमित भूईगळ, किसन चव्हाण उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ निवडणूक लढणार आहेत का, याविषयी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी भुजबळ यांच्यासारखा ओबीसी नेता संसदेत असणे सध्याच्या घडीला आवश्यक आहे. ते संसदेत असतील तरच ओबीसींच्या समस्यांचा ताकदीने पाठपुरावा करू शकतात, असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीला आहे. त्यामुळेच ते निवडणूक लढणार असतील तर नाशिक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे त्यांना समर्थन राहणार आहे. भुजबळ यांच्याशिवाय इतर उमेदवार रिंगणात असेल तर त्याच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही लढणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे भदे यांनी स्पष्ट केले. 

वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे असेल तर १२ जागांच्या मागणीचा विचार व्हायला हवा. त्यावर काँग्रेसकडून कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सभांची घोडदौड सुरूच आहे. त्यातून कोणाला किती जनाधार आहे, हे दिसतच आहे. त्यातून मतदारांना तिसºया पर्यायाची गरज असल्याचे दिसत आहे, असेही भदे म्हणाले. 

- सरकारने सर्वच समाजाची फसवणूक केली
भाजप सरकारने धनगर, ओबीसी, कोळी, धोबी, बंजारा या समाजाच्या मागण्यांना आश्वासनाचे गाजर देत फसवणूक केली. त्यामुळे यासह अनेक समाज नाराज आहेत. न्यायापासून वंचित सर्व समाजाला उमेदवारी मिळण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची असल्याचेही भदे म्हणाले.

Web Title: Vanchit Bahujan Aghadi will give Support to Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.