मुंबईतील महापालिका शाळांमध्ये 'वंदे मातरम्' बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 05:12 PM2017-08-10T17:12:10+5:302017-08-10T19:21:47+5:30
मुंबई महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी महापालिका शाळांमध्ये 'वंदे मातरम्'चे गायन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
मुंबई, दि. 10 - मुंबई महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी महापालिका शाळांमध्ये 'वंदे मातरम्'चे गायन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या या निर्णयावरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि सपाचा विरोध डावलून शिवसेना-भाजपाने हा प्रस्ताव मंजूर केला. भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी हा प्रस्ताव मांडला.
आठवडयातून दोन दिवस शाळांमध्ये 'वंदे मातरम्'चे गायन होईल. मनपा आयुक्त अजोय मेेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी हा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होईल. महापालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होत असताना काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. अनेक मुस्लिमांचा वंदे मातरमच्या सक्तीला विरोध आहे.
प्रसिद्ध वकिल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन आणि एमआयएमच्या आमदारांनी वंदे मातरमच्या सक्तीला विरोध केला आहे. मुंबई पालिकेत भाजपाने प्रत्येक पालिका शाळेत वंदेमातरम म्हणण्यात यावे, अशा ठरावाची सूचना आणली. विधीमंडळाप्रमाणे महापालिकेतही वंदे मातरमची मागणी भाजपाने केली होती. दोन वर्षांपूर्वीही मुंबई पालिकेत असा ठराव आणण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यावेळी यश मिळाले नव्हते.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा दिन साजरा केल्यानंतर पालिका शाळांमध्ये योगा, सुर्य नमस्कार, वंदे मातरम्ची सक्ती करण्याची मागणी भाजपाने केली होती. यावर मोठा वाद झाला होता. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील शाळांमध्ये वंदे मातरम् चे गायन बंधनकारक केल्यानंतर भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी पालिका शाळांमध्ये वंदे मातरम् बंधनकारक करण्याची मागणी केली होती.
त्यासाठी पी वॉर्डचे नगरसेवक असलेल्या पटेल यांनी सूचना मांडली होती. 1998 मध्ये पराग चव्हाण शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी सुद्धा हीच मागणी केली होती. पण 2004 मध्ये तत्कालिन आयुक्तांनी अभिप्रायात ही सक्ती शक्य नसल्याचे म्हटले होते.