वंदे मातरम् कदापि म्हणणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 05:08 AM2017-07-28T05:08:39+5:302017-07-28T05:32:33+5:30
‘आम्हाला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, पण आम्ही कधीही वंदे मातरम म्हणणार नाही’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे.
मुंबई : तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सक्ती करण्याच्या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘आम्हाला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, पण आम्ही कधीही वंदे मातरम म्हणणार नाही’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे.
मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्रातही तशी सक्ती लागू करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी पत्रकारांना सांगितले. यासंदर्भात आझमी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी विरोधी भूमिका घेतली. वंदे मातरमचा मी सन्मान करतो; मात्र माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे मी वंदे मातरा म्हणणार नाही. माझ्यावर कारवाई झाली, मला जेलमध्ये टाकले वा देशाबाहेर काढले तरी मी यावर ठाम असेन, असे आझमी म्हणाले.
एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनीही आझमी यांच्या सुरात सूर मिसळला. माझ्या मानेवर सुरी ठेवली वा माझ्यावर गोळी झाडली तरी मी वंदे मातरम म्हणणार नाही, असे पठाण म्हणाले.
शिवसेनेची वादात उडी
वंदे मातरम्च्या मुद्द्यावरून शिवसेनाही मैदानात उतरली आहे. सेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वारिस पठाण यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, वंदे मातरम् म्हणण्याची इतकीच लाज वाटत असेल, तर स्वत: चालते व्हा. ही आमची मातृभूमी आहे. या भूमीला स्वतंत्र करणारे हे गीत आहे. त्या गीताचा आदर करण्याचा जर त्रास होत असेल, तर इथून निघून जा, असा संतापही रावते यांनी व्यक्त केला.