भाजीपाल्यांचे भाव कडाडले
By admin | Published: September 21, 2016 02:21 AM2016-09-21T02:21:46+5:302016-09-21T02:21:46+5:30
गणेशोत्सव संपून पितृपंधरवडा सुरू झाल्याने सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरात पालेभाज्यांचे भाव कडाडल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपळे गुरव : गणेशोत्सव संपून पितृपंधरवडा सुरू झाल्याने सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरात पालेभाज्यांचे भाव कडाडल्याचे चित्र दिसत आहे. भाजीविक्रीच्या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.
घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याचे स्मरण करून त्याच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी सग्या-सोयऱ्यांना भोजन दिले जाते. भोजनामध्ये विविध पालेभाज्यांचा समावेश असतो.
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मेथी, कारले, गवार, मिरची, खीर, चपाती, अळू, पुरण पोळी हे भोजनातील पदार्थ असतात. पितृपंधरवड्यात मांसाहार वर्ज्य करून धार्मिक विधी केले जातात. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या भस्मासुरांमुळे १०० नागरिकांचे जेवण घालण्यास १० हजार रुपयांच्या पुढे खर्च येतो. एवढ्या महागड्या वस्तू खरेदी करणे काही कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
किराणा वस्तू व पालेभाज्यांची खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे केवळ फक्त ठरावीक जवळच्या नातेवाइकांना पितृपंधरवाड्याचे भोजन देऊन कोणताही डामडौल न करता थोडक्या नातेवाइकांवरच कार्यक्रम पार पाडण्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे.
सध्या पितृपक्ष सुरूझाला असून, पितृपक्षाच्या कार्यक्रमात नैवेद्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. यामध्ये महिला गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. (वार्ताहर)
> आवश्यक भाजीपाला गुलटेकडी, खडकी मार्केट येथून आणावा लागतो. सध्या पावसाची संततधार असल्यामुळे भाज्यांची आवक कमी प्रमाणात आहे. भाजीपाल्यांचे ठोक किमती वाढल्याने, तसेच घेतलेल्या भाज्यांची इंधन वाहतूक वाढली आहे. त्यातच पितृपंधरवड्यामुळे लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी ठेवाव्या लागतात. ग्राहक मात्र भाज्यांच्या किमतीसाठी घासाघीस करतात.
- नारायण बर्गे, भाजीविके्रते, पिंपळे गुरव
>पितृपंधरवड्यामुळे पालेभाज्यांचे भाव कडाडल्याने भोजन देणाऱ्या खाणावळचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. आठवडाभरापूर्वी खाणावळीमध्ये तीन भाज्या असायच्या. आता मात्र एक किंवा दोनच भाज्या द्याव्या लागत आहेत. पितृपंधरवड्यासाठी लागणाऱ्या भेंडी, दुधी भोपळा, बटाटे, तसेच तूर डाळ, हरभरा डाळ, साखर, तेल, बेसनपीठ आदींचे भाव वाढल्याने मोठ्या खाणावळ चालकांनी धसका घेतला आहे.
- अप्पा कदम, खाणावळचालक, नवी सांगवी