VIDEO - तेल अविव विद्यापीठात अ, आ, इ, ई....

By admin | Published: July 8, 2016 05:35 PM2016-07-08T17:35:45+5:302016-07-08T18:34:20+5:30

४ जुलैपासून इस्रायलमधील तेल-अविव विद्यापीठात मराठीचा वर्ग घेण्यास सुरूवात झाली आहे

VIDEO - A A, A, E, E ... in Tel Aviv University | VIDEO - तेल अविव विद्यापीठात अ, आ, इ, ई....

VIDEO - तेल अविव विद्यापीठात अ, आ, इ, ई....

Next
>ओंकार करंबेळकर, ऑनलाइन लोकमत
मुंबई - इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या बेने इस्रायली समुदायाच्या आणि इस्रायलमध्ये मराठी शिकण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी मुंबई विद्यापीठाचे प्रा. विजय तापस, प्रा. सोनाली गुजर आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या कादंबरी भंडारे यांनी ४ जुलैपासून इस्रायलमधील तेल-अविव विद्यापीठात मराठीचा वर्ग घेण्यास सुरूवात केली आहे. या वर्गाच्या चलचित्रफिती खास लोकमतच्या वाचकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
४ जुलै रोजी झालेल्या पहिल्या वर्गाला मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूत डेव्हिड अकोव, इस्रायलमधील भारतीय दूतावासातील उप-राजदूत डॉ. अंजू कुमार आणि तेल-अविव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. रानान रैन उपस्थित होते. पुढील महिनाभर हे वर्ग चालणार असून त्यात २६ इस्रायली विद्यार्थी मराठी शिकणार आहेत. इस्रायलमधील रामले या शहरात  १० जुलैपासून दुसरा वर्ग सुरू होणार असून संध्याकाळी भरणाºया या वर्गात दिवसभर नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर असणाऱ्या इस्रायली नागरिकांना मराठी शिकण्याची संधी मिळणार आहे, असे  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी सांगितले.
 
 
गेल्या वर्षी एका भारतीय-इस्रायली शिष्टमंडळाशी चर्चा करताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी इस्रायली विद्यापीठात महाराष्ट्र आणि मराठी या विषयांसाठी अध्यासन निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. एप्रिल २०१५मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस्रायलला गेले असता तिकडे मराठी शिकण्याची सोय असावी असे निवेदन बेने-इस्रायली समाजाकडून सादर करण्यात आले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. सप्टेंबर २०१५मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख इस्रायलला गेले असता तेल-अविव विद्यापीठासोबत इस्रायलमध्ये मराठी शिकवण्याच्या प्रकल्पाबाबत त्यांनी चर्चा केली.   राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाने संयुक्तपणे तेल-अविव विद्यापीठात मराठी शिकवायचे ठरवले. १४ फेब्रुवारी २०१६ रोजी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षºया झाल्या. मराठी शिकायला फार तर फार भारतीय वंशाचे इस्रायली (बेने-इस्रायल) पुढे येतील असे आयोजकांना वाटले होते. पण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मूळच्या इस्रायली विद्यार्थ्यांचीही चांगली संख्या आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मुंबईतील इस्रायली वाणिज्य दूतावास तसेच तेल-अविवमधील भारतीय दूतावासाची मदत झाली आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य तसेच इस्रायलच्या वाणिज्य दूतावासात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणारे अनय जोगळेकर यांनी या प्रकल्पात समन्वयकाची भूमिका बजावली आहे.
 
महाराष्ट्राशी विशेष नाते
 
भारतामध्ये दोन हजार वर्षांपुर्वी आलेले ज्यू बांधव येथील संस्कृतीचाच एक भाग बनून गेले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपास ३० हजार लोकसंख्या असणाºया या समुदायाचे आता केवळ ४६५० सदस्य भारतात राहिले आहेत. त्यातील २४६६ सदस्य महाराष्ट्रामध्ये राहतात. महाराष्ट्रात रायगड, ठाणे, मुंबई आणि पुणे येथे ज्यू एकवटले असून त्यांचे महाराष्ट्राशी आणि कोकणाशी विशेष नाते आहे. रायगड जिल्ह्यातील नौगांव येथे त्यांनी सर्वप्रथम आश्रय घेतला. तेल काढण्याचा व्यवसाय करत असल्याने आणि शनिवारी सुटी घेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना शनिवार तेली असेही संबोधन मिळाले. त्याचप्रमाणे त्यांना बेने इस्रायली (इस्रायलची लेकरे) असेही म्हटले जाते. ज्या गावांमध्ये स्थायिक झाले त्या गावाच्या नावाने त्यांनी पेणकर, किहिमकर, घोसाळकर, रोहेकर अशी आडनावे घेतली. मुंबई आणि पुण्याच्या स्थापत्य, शिक्षण, आरोग्य तसेच व्यापारामध्ये ज्यू धर्मियांचा विशेष वाटा आहे. डेव्हीड ससून लायब्ररी तसेच ससून डॉक हे त्याचाच भाग आहेत. महाराष्ट्राप्रमाणे केरळ, कोलकाता येथेही ज्यू धर्मियांनी विशेष कार्य केले. बेने मनाशे नावाने ओळखला जाणार ज्यू समुदाय ईशान्य भारतात वास्तव्यास असून त्यातीलही काही सदस्य इस्रायलला गेले आहेत. कवी निस्सिम इझिकेल, १९७१ च्या युद्धात महत्वाची भूमिका बजावणारे जे.एफ.आर जेकब, डेव्हीड ससून, अभिनेत्री नादिरा, सुलोचना (रुबी मायर्स) अशा अनेक ज्यू धर्मियांनी भारताच्या सांस्कृतीक, साहित्य, संरक्षण, व्यापार क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले.
 

Web Title: VIDEO - A A, A, E, E ... in Tel Aviv University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.