VIDEO- जोतिबाच्या नावानं आसमंत दुमदुमला

By Admin | Published: April 10, 2017 06:29 PM2017-04-10T18:29:35+5:302017-04-10T18:29:35+5:30

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 10 - जोतिबाच्या नावानं चांगभलचा गजर, खोबरे गुलालाची उधळण, दवणाचा मान, मानाच्या शेकडो गगनचुंबी सासनकाठ्यांची ...

VIDEO-Jyotiba's Avantum Dum Dumula | VIDEO- जोतिबाच्या नावानं आसमंत दुमदुमला

VIDEO- जोतिबाच्या नावानं आसमंत दुमदुमला

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 - जोतिबाच्या नावानं चांगभलचा गजर, खोबरे गुलालाची उधळण, दवणाचा मान, मानाच्या शेकडो गगनचुंबी सासनकाठ्यांची लयबद्ध मिरवणूक, हलगी, ताशा, तुतारींच्या तालावर काठीचा तोल सांभाळत देवाच्या भक्तीत लीन होऊन नृत्य करणारे सासनकाठीधारक आणि हा अलौकिक सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या मांदियाळीत दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात पार पडली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात यंदाही चांगला पाऊस होऊ दे, शेतकरी कजर्मुक्त करण्यासाठी शासनाला बळ दे, असे साकडे घातले.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सोहळा. यानिमित्त सोमवारी पहाटे पाच वाजता तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते श्री जोतिबा देवास अभिषेक करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी अजित पवार, व्यवस्थापक लक्ष्मण डबाणे उपस्थित होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मंदिरात आगमन झाले. देवाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारात त्यांच्या हस्ते निनाम पाडळीच्या मानाच्या पहिल्या सासनकाठीचे व विहे गावच्या दुसऱ्या सासनकाठीचे पूजन झाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जोतिबा परिसर विकासासाठी ३० कोटीचा आराखडा करण्यात आला असून २५ कोटी शासन आणि ५ कोटी देवस्थान समिती देणार आहे. या आराखड्यानुसार ५ हजार भाविकांची सोय होईल यादृष्टीने सर्व सुविधायुक्त चार मजली दर्शन मंडपाची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण करून पुढील वर्षी हा दर्शन मंडप भाविकांसाठी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केली जाईल. जोतिबा ते पन्हाळा रोप वे करण्याचा एक प्रस्ताव आला असून या संदर्भात आवश्यक त्या पूतर्ता आणि अडचणी दूर करून सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी प्रशासनास सांगण्यात आले आहे. त्यामुळे रोप वे चा प्रश्नही मार्गी लावला जाईल.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० हजार कोटीने वाढले. पुढच्या वर्षीही पाऊस चांगला झाला तर उत्पन्न काही हजार कोटीने वाढेल. यासाठी महाराष्ट्रात यंदाही चांगला पाऊस होऊ दे, अशी प्रार्थना जोतिबा चरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी आमदार सतेज पाटील, सत्यजित पाटील, शंभूराजे देसाई, बाळासाहेब पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, जोतिबाच्या सरपंच डॉ. रिया सांगळे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलीस अधिक्षक एम. बी. तांबडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य बी.एन. पाटील-मुगळीकर, शिवाजी जाधव, प्रमोद पाटील, संगीता खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

https://www.dailymotion.com/video/x844vku

Web Title: VIDEO-Jyotiba's Avantum Dum Dumula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.