जब्बार पटेल यांना यंदाचा ‘विष्णूदास भावे’ पुरस्कार
By admin | Published: October 13, 2014 05:17 AM2014-10-13T05:17:49+5:302014-10-13T05:17:49+5:30
अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे देण्यात येणारे ‘विष्णूदास भावे गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला
सांगली : अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे देण्यात येणारे ‘विष्णूदास भावे गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला असून, याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. गौरव पदक, स्मृतिचिन्ह आणि रोख अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ५ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमीदिनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. डॉ. जब्बार पटेल यांनी घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. त्याचप्रमाणे बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेल्या ‘सामना’ या चित्रपटाची निर्मिती केली.