विष्णुदास भावे यांचा हरहुन्नरीपणा हाच यशाचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:20 AM2017-11-06T05:20:38+5:302017-11-06T05:20:47+5:30
आद्य नाटककार विष्णुदास भावे पदक स्वीकारल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. भावेंचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे
सांगली : आद्य नाटककार विष्णुदास भावे पदक स्वीकारल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. भावेंचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे. आजच्या अभिनेत्यांनी विष्णुदास भावे यांच्यातील जिद्द, हरहुन्नरीपणा आत्मसात केला, तर त्यांना आयुष्यात यश मिळेल, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी येथे काढले.
अखिल महाराष्टÑ नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात येते. यंदा हे पदक ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाले होते. रविवारी सायंकाळी भावे नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते जोशी यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरव पदक प्रदान करण्यात आले. या वेळी मोहन जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी, निर्मला सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष असलेले मोहन जोशी लवकरच परिषदेचे नेतृत्व सोडणार आहेत, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी कार्यक्रमात केला. मोहन जोशी यांच्या मनात सध्या काही वेगळेच चालले आहे; पण नाट्यपरिषदेच्या वादात कलावंतांना पोरके करू नका, असे भावनिक आवाहनही सावरकर यांनी जोशी यांना केले.