खाण-क्रशर संघटनेकडून ब्रिथ अॅनालायझर मशिन भेट
By Admin | Published: July 21, 2016 02:18 AM2016-07-21T02:18:07+5:302016-07-21T02:18:07+5:30
तळेगाव एमआयडीसी व वडगाव या पोलीस ठाण्याला मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाकडून ‘अल्कोहोल ब्रिथ अॅनालायझर’ मशिन भेट देण्यात आले.
वडगाव मावळ : मद्यधुंद बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व वडगाव या पोलीस ठाण्याला मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाकडून ‘अल्कोहोल ब्रिथ अॅनालायझर’ मशिन भेट देण्यात आले.
तळेगाव दाभाडे येथील पोलीस ठाण्यात देहूरोड उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मशिन सुपूर्त करण्यात आले.
या वेळी पानसरे म्हणाले, ‘‘तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व वडगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातास कारणीभूत असलेल्या मद्यधुंद बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करताना ‘अल्कोहोल ब्रिथ अॅनलायझर’ मशिनअभावी कारवाईस विलंब व अडथळा निर्माण होत होता. मद्यधुंद बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी वाढल्याने अपघाताच्या घटनेत वाढ होऊन बळींची संख्या वाढत होती. मशिन मिळाल्याने मद्यधुंद बेशिस्त वाहनचालकांवर त्वरित कारवाई केली जाईल. यामुळे अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊन प्रवास सुरक्षित होईल.’’
संघाचे अध्यक्ष विलास काळोखे यांनी मशिन भेट देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी मशिनचे प्रात्यक्षिक कर्मचाऱ्यांना करून दाखविले. मशिनद्वारे मद्यप्रमाणाचे प्रमाणपत्र त्वरित निघते. ते न्यायालयात ग्राह्य मानले जाते.
या प्रसंगी पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघ उपाध्यक्ष रामदास काकडे, अरुण मोरे, प्रदीप काळे, सहायक पोलीस निरीक्षक वायसिंग पाटील, सुनील शेळके, किरण
काकडे, सागर पवार, सुधाकर
शेळके, श्रीकांत वायकर, संदीप काळोखे, विक्रम काकडे, मयूर काळोखे, शिवराज गाडे उपस्थित
होते.
पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)