वीर जवान, पुलवामातील शहिदांसाठी मतदान करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 05:34 AM2019-04-10T05:34:02+5:302019-04-10T05:35:42+5:30
नरेंद्र मोदी; शरदराव, तुम्ही तिथे शोभत नाही
लातूर : नवमतदारांनो, बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणारे वीर जवान, पुलवामातील शहीद, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांना पक्की घरे मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले पहिले मतदान करा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत एका प्रकारे सैनिकांच्या नावानेच मते मागितली. पंतप्रधानांनी मंगळवारच्या सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुन्हा उल्लेख केला.
शरदराव़, तुम्ही कोणा लोकांसोबत उभे आहात? काँग्रेसकडून तर देशाला अपेक्षा नाहीत़, पण शरदराव तुम्हीसुद्धा? शरदराव तुम्हाला शोभून दिसते? असे सवाल करीत मोदी यांनी महाआघाडीवरून शरद पवारांवर उपरोधिक टोलेबाजी केली़ मोदींनी भाषणात दहशतवाद, पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा जाहीरनामा व भाजप सरकारच्या योजनांवर विवेचन केले़ पाकिस्तानचे विमान पाडले यावर किती पुरावे द्यायचे? तुमच्या वीर जवानांवर तुम्हाला विश्वास नाही? देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांना परवाना देण्याचे काँग्रेसचे धोरण आहे़ त्यांनी देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा केलीच आहे़, असे मोदी म्हणाले.
आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, श्री सिद्धेश्वर, तसेच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा उद्घोष करून मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. भाषणाचा शेवटही मराठीत केला. ते म्हणाले की, काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचे नागरिकत्व हिसकावले होते़ काँग्रेसने हिंमत दाखविली असती, तर फाळणी झालीच नसती अन् पाकिस्तानचा जन्मच झाला नसता. मध्य प्रदेशात नोटांची बंडले कोणाकडे निघाली? सहा महिन्यांच्या काळात अब्जावधी रुपयांची लूट कशी काय केली जाऊ शकते? हे जनतेला समजले आहे, असे सांगताना काँग्रेस इमानदारीने भ्रष्टाचार करते, असा आरोपही त्यांनी केला.
हातात हात घालून मंचावर
मोदी आणि उद्धव ठाकरे हातात हात घालून मंचावर आले. मोदींनी ठाकरेंना ‘छोटे भाई’ अशी साद घातली. भाजपच्या संकल्पपत्राचे उद्धव ठाकरेंनी कौतुक केले. मात्र पाकिस्तानचा एकदाचा हिशेब करा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ठाकरेंचे संपूर्ण भाषण थोडे कौतुक,
थोड्या अपेक्षा असे होते.