150 किमीची पदयात्रा करा, मतदारांना भेटा; 'त्या' सर्वेक्षणानंतर भाजपाच्या आमदारांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 07:15 AM2018-10-17T07:15:50+5:302018-10-17T07:16:55+5:30
अंतर्गत सर्वेक्षणातून भाजपाच्या 40 टक्के आमदारांची निराशाजनक असल्याची माहिती समोर
मुंबई: मतदारांसोबतचा संपर्क वाढवण्यासाठी पदयात्रा करण्याच्या सूचना प्रदेश भाजपाकडूनआमदारांना देण्यात आल्या आहेत. शेतीशी संबंधित प्रश्न, दुष्काळसदृश्य परिस्थिती, इंधनाचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनतेत सरकारविरोधात नाराजी आहे. त्यातच भाजपाच्या 40 टक्के आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचं पक्षाकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणाची भाजपा नेतृत्त्वानं चांगलीच धास्ती घेतली आहे. मतदारसंघात पदयात्रा करा, लोकांना भेटा, अशा सूचना प्रदेश भाजपानं सर्व आमदारांना दिल्या आहेत.
संपर्क अभियानाच्या अंतर्गत भाजपाच्या सर्व आमदारांना 150 किलोमीटरची पदयात्रा करावी लागणार आहे. यामुळे मतदारांशी असलेला संपर्क आणखी वाढेल, अशी माहिती पक्षाच्या एका नेत्यानं दिली. 'महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत. गांधींचं जयंती वर्ष विधायक कामानिमित्त लक्षात राहावं, यासाठी ही पदयात्रा केली जाणार आहे,' अशी माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. 'संपर्क अभियान कशा पद्धतीनं राबवायचं, त्याचा नेमका हेतू काय, पक्षाला यातून नेमकं काय अपेक्षित आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती 121 आमदारांना देण्यात आली आहे,' असंदेखील या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.
2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 122 आमदार निवडून आले. मात्र नागपूरचे आमदार आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यानं भाजपाच्या आमदारांची संख्या 121 वर आली आहे. त्यातच गेल्याच आठवड्यात भाजपानं केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी पुढे आली. दिल्लीतील चाणक्य या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, भाजपाच्या 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. आमदारांच्या मतदारसंघातील जनतेला प्रश्न विचारुन हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळेच प्रदेश भाजपानं रस्त्यावर उतरुन मतदारांना भेटण्याच्या, त्यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना केल्याची माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.