‘आम्ही तुमचे नोकर नाहीत, हे लक्षात घ्यावे’
By Admin | Published: July 12, 2015 12:21 AM2015-07-12T00:21:36+5:302015-07-12T00:21:36+5:30
‘इंग्लंडचा राजा हत्तीवरून व भारतीय राजे त्याच्या मागे पायी चालणार हे मला पसंत नाही. मी पायी चालेन पण माझ्या मनात मात्र या गोष्टीचा निषेधच असेल.
राजू इनामदार, पुणे
‘इंग्लंडचा राजा हत्तीवरून व भारतीय राजे त्याच्या मागे पायी चालणार हे मला पसंत नाही. मी पायी चालेन पण माझ्या मनात मात्र या गोष्टीचा निषेधच असेल. तुम्ही आम्हाला तुमचे नोकर समजत आहात असे दिसते, पण आम्ही तसे नाहीत हे लक्षात घ्यावे.’
मोजक्याच पण अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त करणारे हे पत्र बडोदा संस्थानच्या सयाजीराव गायकवाड महाराजांचे आहे. इंग्लंडचे राजेसाहेब येणार, त्यांच्या दिल्लीतील मिरवणुकीत ते बसलेल्या हत्तीच्या मागे भारतीय संस्थानिकांनी पायी चालत जावे, असे सुचवणारे पत्र एका इंग्रज अधिकाऱ्याने भारतीय संस्थानिकांना लिहिले होते. स्वाभिमानी सयाजीरावांनी त्या पत्राला दिलेले हे उत्तर आहे.
तत्कालीन व्हाईसरॉय, इंग्रज अधिकारी यांच्यासह काही भारतीय संस्थानिक व कुटुंबातील सदस्यांनाही सयाजीरावांनी लिहिलेली अशी ४००हून अधिक पत्रं लवकरच मराठीत अनुवादित होत आहेत. त्यातून इंग्रजधार्जिणे अशी टीका होत असलेल्या सयाजीरावांच्या कठोर, प्रजाहितदक्ष स्वभावाचे नवनवे पैलू उलगडण्यास मदत होणार आहे. अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेले अहमदनगरचे साहित्यिक विलास गिते ही पत्रं अनुवादित करत आहेत. महाराजांच्या देशप्रेमावर या पत्रांमधून प्रकाश पडतोच; पण त्यांची सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक मतेही समोर येऊन त्यांची सुधारक वृत्ती लक्षात येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सयाजीरावांनी आर्थिक मदत केली होती. ती पाहून सयाजीरावांच्या कुटुंबातील काहीजणांनी शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यांना लिहिलेल्या पत्रात सयाजीरावांनी म्हटले आहे की, ‘तुम्हाला इंग्लंडला मौजमजा करण्यासाठी जायचे आहे. तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो तुम्ही इथेही करू शकता, त्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही.’
सामाजिक सुधारणांच्या बाबतीत सयाजीरावांचे विचार फारच पुरोगामी स्वरूपाचे होते. धर्म किंवा जात,पंथ,भेद याचा त्यांना तिटकारा होता. तसा आशय व्यक्त करणारी काही पत्रं आहेत. प्रशासकीय सुधारणांच्या संदर्भात तर महाराजांचा विशेष अभ्यास होता. संस्थानातील अधिकाऱ्यांना तसेच इंग्रज प्रशासनाला लिहिलेल्या त्यांच्या पत्रांमधून कामकाजासंबंधीच्या अनेक सूचना आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी कामाच्या बाबतीत कसे वागावे, लोकांबरोबर सौहार्दाने कसे बोलावे, काम गतिमान व्हावे यासाठी काय करावे, अशा अतिशय काटेकोर सूचना असणारे त्यांचे एक पुस्तकच आहे. ‘मायनर हिंट्स’ असे त्याचे मूळ नाव आहे. गुजरात सरकारच्या वतीने आजही सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या व्यक्तीला नोकरीच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकाची प्रत देण्यात येते.
1914-1918
च्या दरम्यानची ही सर्व पत्रे आहेत. मूळ महाराष्ट्रीय असलेल्या सयाजीरावांना गुजरातमध्ये मान होता. महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी जनांना त्यांनी दत्तक जाताना दिलेल्या ‘मी राजा होण्यासाठी आलो आहे’, या तडफदार उत्तराशिवाय माहिती नाही. पत्रांच्या अनुवादामुळे आता अन्य पैलूही ज्ञात होतील.
सोन्याचे सिंह वितळवले
बडोदा येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या अरविंद घोष यांनी महाराजांच्या वतीने ही पत्रं लिहिली. महाराजांचे स्विय सहायक म्हणूनही ते काम करीत असत. योगी अरविंद म्हणून कालांतराने ते आध्यात्मिक क्षेत्रात प्रसिद्ध झाले.
भारतातील दुर्मिळ वस्तू इंग्रज अधिकारी इंग्लंडला कशा पळवून नेत याचीही माहिती या पत्रांमधून मिळते. पंचम जॉर्ज यांच्या बडोदा भेटीत त्यांच्या राणीला महाराजांच्या संग्रहातील सोन्याचे दोन अप्रतिम सिंह आवडले. सिंहाच्या या जोडीजवळ त्या बराच वेळ रेंगाळल्या. आता या सिंहांवर संक्रांत येणार हे महाराजांनी ओळखले व दौरा संपवून ते दिल्लीला गेल्यानंतर लगेचच ते दोन्ही सिंह त्यांनी वितळवून टाकले.
अपेक्षेप्रमाणेच व्हाईसरॉयचे सिंहांची मागणी करणारे पत्र आले. महाराजांनी लगेचच त्यांना आर्थिक अडचणीमुळे ते सिंह वितळवून टाकल्याचे कळवले.