भोगी सण का साजरा करतात? जाणून घ्या 'भोगी'चे महत्त्व
By Admin | Published: January 13, 2017 02:04 PM2017-01-13T14:04:25+5:302017-01-13T15:22:56+5:30
पौष महिन्यात, हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे 13 जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - 'मकर संक्रांती'च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे 13 जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार जेवणाचा बेत आखला जातो.
माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य यावे, असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. विशेष करुन पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'लोहरी' हा सण जल्लोषात साजरा केला जातो. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो.
भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात. या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते.
घरातील देवांची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा आहे.
भोगी देणे म्हणजे काय ?
भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सुवासिनींना जेवणासाठी बोलावले जाते. शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.