मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक स्मार्ट कधी होणार? जुनेच प्रकल्प; नव्यांचे नाव नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 01:07 AM2018-09-03T01:07:16+5:302018-09-03T01:07:34+5:30
स्मार्ट सिटी योजनेतंर्गत जुन्याच कामांना कल्हई करण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांची दत्तक घेतलेले नाशिक शहर स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
- संजय पाठक
नाशिक : स्मार्ट सिटी योजनेतंर्गत जुन्याच कामांना कल्हई करण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांची दत्तक घेतलेले नाशिक शहर स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
नाशिक शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने नाशिकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र २ हजार १९४ कोटी रूपयांच्या योजनेसाठी सरकारकडून भरघोस निधी मिळाला, परंतु कामे पुढे सरकली नाहीत. उलट जुन्या कामांचा रेट्रो फिटींग अंतर्गत सामावेश असल्याने रस्ते, उद्यानाचे नुतनीकरण आणि स्मशानभूमीत विद्युतदाहिनी अशी सपक कामे घुसविण्यात आली. तीन वर्षे उलटत आली तरी ई पार्किंग, सायकल शेअरिंग, प्रोजेक्ट गोदा ग्रीन फिल्ड अंतर्गत पाचशे एकरात नियोजनबद्ध विकास करणे, गावठाण विकास, चोवीस तास पाणी पुरवठा ही सर्व कामे केवळ चर्चेत आहेत.
स्मार्ट सिटी कंपनीने कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाचे नुतनीकरण करून दिले, त्याचे लोकार्पण झाले. गोदावरी नदीवरील पुल, नाशिक अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनी बसविणे यासारखी कामे महापालिकाही सहज करू शकली असती. कंपनीला ३८४ कोटी रूपये निधी मिळाला परंतु कामे दिसत नाहीत.
सीसीटीव्ही बसविणे व फायबर आॅप्टिक केबल टाकण्याची कामे राज्य सरकारने ताब्यात घेतली असून त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. पाचशे एकरात ग्रीन फिल्ड विकास योजना करण्याचा मानस होता मात्र महपाालिकेचा अंशत: आराखडा मंजुर असून त्यामुळे नगररचना योजना राबविण्याची अधिसूचना निघालेली नाही.
ही कामे होणार : ई टॉयलेट, पर्यटन केंद्र, इ-पार्किंग, प्रोजेक्ट गोदा, स्मार्ट लाईट, कुशल कौशल्य योजना
महापालिकेला आगाऊ निधी मिळाला आहे. कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण झाले आहेत. ई-पार्किंगचे काम सुरू आहे. स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अन्य अनेक कामांसाठी निविदा मागवल्या असून, काम वेगाने पुढे जात आहेत.
- रंजना भानसी, महापौर