Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:49 PM2019-03-20T18:49:37+5:302019-03-20T18:55:05+5:30
शिवसेना काँग्रेसने त्यांच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला.
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर ही पक्षाची पहिली लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणेंची जागा काय आहे, हे आम्हाला आणि इतरांनाही कळेल. शिवसेना काँग्रेसने त्यांच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला. आता राणे त्यांचा पक्ष वाढविणार, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. यावेळी नितेश राणे यांनी नारायण राणे यांची लोकसभेसाठीची भुमिका स्पष्ट केली.
देश महासत्ता बनण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्यासाठी ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. आपल्या देशातील तरुणाईची संख्या जपान, चीनच्या तुलनेत जास्त आहे आणि वाढत जाईल. त्यांची स्वप्ने कशी पूर्ण होतील याकडे ही निवडणूक जाणार असल्याचे सांगतानाच त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. आमच्यासाठी राजकीय दृष्टीकोणातून आणि राज्याच्या राजकारणात आमची जागा काय असेल हे दाखविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे सांगितले.
लोकसभेनंतर राणे पिता-पूत्र एकाच झेंड्याखाली
यानंतर मुलगा काँग्रेसचा आमदार, स्वत: भाजपच्या तिकिटावर नारायण राणे खासदार यामुळे तुम्हाला महाराष्ट्राने का स्वीकारावे असा प्रश्न नितेश राणें यांना विचारला असता त्यांनी राणेंना हा निर्णय का घ्यावा लागला हे पटवून देऊ, असे सांगितले. राणेंनी ते सर्व मांडलेलेही आहे. काँग्रेसने राणेंना कोणती आश्वासने दिली होती, किती पाळली ते लोकांनाही माहित आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सर्वजण एका छत्रीखाली, एकाच पक्षाच्या झेंड्याखाली दिसू, त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागणार नाही. अडचणी असल्याने काँग्रेसमध्ये मी सध्या तांत्रिकदृष्य्ट्या आहे. राणे लपूनछपून बोलणारा नाही. ते स्पष्ट बोलतात. यामुळे जनता समजून जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.