वादळी वाऱ्याचे राज्यात चार बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:42 AM2018-05-29T05:42:18+5:302018-05-29T05:42:18+5:30
वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसाने लातूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार जणांचे बळी घेतले.
लातूर/सांगली/सातारा : वळवाच्या पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टÑाच्या काही भागामध्ये सोमवारी वादळी वाºयासह आलेल्या जोरदार पावसाने लातूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार जणांचे बळी घेतले.
निलंगा (लातूर) शहरासह परिसराला सोमवारी दुपारी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने झोडपले. या वेळी शेतात काम करणारे नारायण लादे (६५) हे स्वत:चा बचाव करण्यासाठी पळत असताना अडखळून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब, मोबाइल टॉवर आणि मोठमोठी वृक्षही उन्मळून पडले. त्यामुळे तालुक्यातील काही गावांतील वीजपुरवठा, मोबाइल सेवा खंडित झाली होती.
जत (जि. सांगली) शहर व तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वाºयाने दोन बळी घेतले. भीमराव शिवाप्पा हिंचगेरी (४०, रा. जाडरबोबलाद) यांचा वीज कोसळून, तर आंबुबाई आबासाहेब जगताप (४०, रा. निगडी खुर्द) यांचा अंगावर मातीची भिंत कोसळून मृत्यू झाला. वादळी वाºयामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
तसेच सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे अंगावर भिंत पडल्याने छाया साहेबराव जाधव (५२) या महिलेचा मृत्यू झाला.