जागतिक इंटरनेट दिन : पुणेकर ठरत आहेत सर्वाधिक सायबर क्राईमचे बळी, वाचा धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:49 PM2018-10-29T17:49:58+5:302018-10-29T17:52:37+5:30
दिवसेंदिवस ग्लोबल होत चाललेल्या पुणे शहरात सायबर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असून हे प्रमाण तिपटीने वाढले आहे.
पुणे :दिवसेंदिवस ग्लोबल होत चाललेल्या पुणे शहरात सायबर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असून हे प्रमाण तिपटीने वाढले आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
- सायबर क्रॉईम विभागाकडे १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत असे गुन्हे घडल्याचे तब्बल २ हजार ७९९ अर्ज आले असून त्यातील सर्वाधिक २ हजार १०८ तक्रारी डेबीट, क्रेडीट आणि एटीएम कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या आहेत. या तक्रारींची सरासरी पाहिली असता शहरात दररोज १५ अर्ज दाखल होत आहेत.
- तुमच्या एटीएम कार्डची वैधता संपली असून नवीन कार्डसाठी सीव्हीव्ही नंबर आणि त्यानंतर आलेला ओटीपी सेंड करा, असे फोन विविध प्रकारचे कार्ड वापरणा-यांना येतात. फोनवर सांगितल्याप्रमाणे वापरकर्त्यांने सीव्हीव्ही आणि ओटीपी सांगितला की, त्यांच्या खात्यातून काही रक्कम कमी झाल्याचे प्रकार सध्या सर्रास घडत आहेत. तसेच फेसबुकच्या माध्यमातून परदेशी व्यक्तीबरोबर प्रेम संबंध निर्माण होतात. काही दिवसांनी परदेशी व्यक्ती महागडे गिफ्ट पाठवते. मात्र ते विमानतळावर किंवा आयकर विभागाकडे अडकले असून ते सोडविण्याचा बाहणा करून लाखो रुपये उकळले जातात.
- सायबर क्रॉईम हे केवळ आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित नसून सोशल माध्यमातून बदनामी, हॅकींग आणि डाटा चोरी असे गुन्हे देखील या माध्यमातून केले जात आहेत. फेसबूकच्या माध्यमातून बदनामी केल्याचे, विविध पोस्ट आणि अश्लील फोटो टाकल्याचे गेल्या अडीच वर्षात १ हजार २७६ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.
व्हॉटसअॅपच्यामाध्यमातून २२५ गुन्हे
- व्हॉटसअॅप म्हणजे आजच्या तरुणाईचा जीव की प्राण झाला आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार हे माध्यम आवश्यक असले तरी त्याचा प्रत्येकवेळी चांगल्याच कामासाठी वापर होते असे नाही. व्हॉटअॅपच्यामाध्यमातून बदनामी, अश्लील फोटो टाकणे आणि कमेंट केल्याप्रकरणी अडीच वर्षांत २२५ गुन्हे घडले आहेत.
गुन्हयांमध्ये तिप्पटीने वाढ
- २०१६ सालापर्यंत सायबर क्रॉईमची संख्या मर्यादित होती. त्यावर्षी शहरात २ हजार ७९ प्रकार घडले होते. मात्र २०१७ मध्ये या प्रकारांत तीप्पट वाढ होत हा आकडा ५ हजार ७४१ वर पोहचला आहे
- मागील दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी देखील त्यात वाढच झाल्याचे दिसते. २०१६ साली आर्थिक फसवणुकीचे १ हजार १६७ गुन्हे दाखल झाले होते. २०१६ साली २ हजार ७९ तर २०१७ साली ५ हजार ७४१ तक्रार अर्ज दाखल झाले आहे. तर २०१७ मध्ये ही संख्या ४ हजार ३२० झाली होती.