मालेगाव येथे नाफेडद्वारे तूर खरेदी सुरू ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 14:43 IST2018-02-14T14:43:37+5:302018-02-14T14:43:44+5:30
मालेगाव येथे नाफेडची तूर खरेदी सुरू झाली असून, यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे

मालेगाव येथे नाफेडद्वारे तूर खरेदी सुरू ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल
मालेगाव : मालेगाव येथे नाफेडची तूर खरेदी सुरू झाली असून, यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. सन २०१७-१८ या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले होते. मालेगाव येथे तूर खरेदी सुरू झाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहित माने, जिल्हा मार्गदर्शक दत्ता जोगदंड, अजाबराव बनसोड, विश्वनाथ जोगदंड, राहूल बनसोड, अजय इंगोले, योगेश काळे आदींनी ८ फेब्रुवारी रोजी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. याची दखल म्हणून आता नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहित माने यांनी केला.
वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव, अनसिंग येथे खरेदी केंद्रे १ फेब्रुवारीला उघडण्यात येतील, असे प्रशासनाने जाहिर केले होते. मनुष्यबळाचा अभाव, भौतिक सुविधांचा अभाव व अन्य कारणांमुळे ही खरेदी केंद्र विलंबाने सुरू झाली होती तर मालेगाव येथे खरेदी केंद्र सुरूच झाले नव्हते. यामुळे शेतकºयांची आर्थिक लूट होत होती. हमीभाव शासनाने ५४५० असा प्रतिक्विंटल हमीभाव तूरीला दिलेला आहे. बाजार समित्यांमध्ये ४२०० ते ४६०० रुपयादरम्यान तूरीला बाजारभाव मिळतो. आता मालेगाव येथे खरेदी केंद्र झाले असून, नाफेडने शेतकºयांना चुकारे लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली.