१४ दशकांची अतुट मैत्री

By admin | Published: July 10, 2016 09:48 AM2016-07-10T09:48:06+5:302016-07-10T09:48:06+5:30

एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना मुंबईतील माझगाव परिसरात बेने इस्रायली समुदायाची शाळा मुलांना मराठीचे अविरत शिक्षण देत आहे. येथील सर एली कदुरी शाळेने नुकतेच १४२व्या वर्षामध्ये पदार्पण केले. शाळेतील शिक्षक घरोघरी जाऊन झोपडपट्टीतील पालकांना भेटतात.शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्वत:च्या खिशातून पदरमोडही करतात.

14 decades of friendship forever | १४ दशकांची अतुट मैत्री

१४ दशकांची अतुट मैत्री

Next
style="text-align: justify;"> 
ओंकार करंबेळकर
 
एन केलोहेनु, एन काआदोनेनु बेने इस्रायलींचा १४ दशके तेवणारा मराठी ज्ञानयज्ञ मुलांना कोणत्या माध्यमात शिकवावे, आमच्या मुलांचे पुढे काय होणार असे प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतात, या विषयांवर कधीही चर्चा होऊ शकतात इतके हे विषय जिवंत आहेत. एकीकडे मराठी शाळा ओस पडून बंद होण्याची संख्या वाढीस लागलेली असताना मुंबईतील माझगाव परिसरामध्ये मात्र बेने इस्रायली समुदायाने चालविलेली शाळा मुलांना मराठीचे अविरत शिक्षण देत आहे. गेली १४१ वर्षे सर एली कदुरी शाळा माझगावात सुरू असून, ५ जुलै रोजी या शाळेने १४२व्या वर्षामध्ये पदार्पण केले.
१८७५ साली मराठी भाषिक बेने इस्रायली (ज्यू) समुदायामधील मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी हाईम सॅम्युएल केहिमकर (केहिमकर बाबा) यांनी या शाळेची डोंगरी येथे इस्रायली स्कूल नावाने स्थापना केली. सुरुवातीच्या काळामध्ये केवळ मुलींसाठी सुरू झालेल्या या शाळेमध्ये काही कालावधीनंतर ज्यू मुलांनाही प्रवेश देण्यात आला. त्यानंतर इतर धर्मीयांची मुलेही शाळेमध्ये येऊ लागली. १९३५ साली प्रसिद्ध ज्यू व्यापारी सर एली कदुरी भारताच्या भेटीवर आले असता त्यांनी या शाळेलाही भेट दिली. ज्यू मुलांच्या शिक्षणासाठी चाललेले काम पाहून ते भारावून गेले आणि शाळेला मोठी रक्कम त्यांनी देणगी म्हणून दिली. त्याच कृतज्ञतेपोटी शाळेचे नामांतर सर एली कदुरी स्कूल असे करण्यात आले.
१९७२-७५ या काळापर्यंत शाळेमध्ये ज्यू मुले मोठ्या संख्येने (एकूण मुलांपैकी जवळजवळ ९५ टक्के) शिक्षण घेत होती, मात्र त्यानंतर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे ज्यू विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. २००७ या वर्षानंतर शाळेमध्ये ज्यू विद्यार्थी आणि ज्यू शिक्षक नाहीत. तरीही इतकी वर्षे सुरू असणारे मराठी शिक्षणाचे कार्य शाळेच्या ज्यू विश्वस्तांनी कायम ठेवले. सर्व विश्वस्त ज्यू आणि सर्व विद्यार्थी मात्र इतर धर्माचे अशी ही एकमेव मराठी शाळा असावी. प्राथमिक इयत्तांपासून बारावीपर्यंत सर्व वर्गात मिळून १००० मुले येथे शिक्षण घेत आहेत.
मराठी शाळांची पटसंख्या टिकवून ठेवणे हे एक आव्हान झाले आहे. अशा स्थितीत शाळेचे शिक्षक माझगावसारख्या परिसरामध्ये राहणाऱ्या निम्न उत्पन्न गटातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व अक्षरश: घरोघरी जाऊन पटवून देतात. झोपडपट्टीतील पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची विनंती केली जाते. या मुलांना शाळेत येता यावे यासाठी शिक्षकांनी दरमहा पैसे गोळा करून त्यांच्यासाठी व्हॅनचीही सोय केली आहे. कित्येक गरीब पालकांकडे आधारकार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रेही नसतात, विद्यार्थ्यांना ती मिळवून देण्यासाठी शाळा मदत करते. ‘राइट टू एज्युकेशन’ अंतर्गत शाळेत शिक्षण घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 
इंग्रजी शिक्षणाची मागणी लक्षात घेऊन शाळेच्या प्रशासनाने २००५ सालापासून सेमी इंग्रजी माध्यमाची सोय सुरू केली. मराठी मुलांनी नवी माहिती गोळा करावी, वर्तमानपत्रे वाचावीत यासाठी त्यांना विशेष प्रोत्साहन देऊन कदुरी टॅलेंट सर्च हा उपक्रमही राबविला जातो. या सर्व उपक्रमांचे फलित म्हणून या वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ‘सदा शुद्ध ठेवीन चारित्र्य माझे, अगा माझीया जीव संजीवना’ या मराठी प्रार्थनेबरोबर ‘एन केलोहेनु, एन काआदोनेनु, एन केमलकेनु, एन केमोशिएनु’ या हिब्रू प्रार्थनेचे स्वर आजही शाळेमध्ये दररोज घुमतात. 
केहिमकरबाबा
हाईम सॅम्युएल केहिमकर हे केहिमकर बाबा या नावाने प्रसिद्ध होते. मूळच्या अलिबागमधील असणाऱ्या केहिमकर यांनी शिक्षणप्रसारासाठी विशेष प्रयत्न केले होते. १८३१ साली हाईम यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (आजचा रायगड) अलिबाग येथे झाला. त्यांचे वडील सॅम्युअल तीस ते चाळीस शाळांचे सरपंतोजी (इन्स्पेक्टर) होते. अलिबागला मराठीचे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी हाईम मुंबईला आले. चार वर्षांच्या शिक्षणानंतर मिलिटरी बोर्ड आणि नंतर इन्स्पेक्टर जनरल आॅफ आॅर्डिनन्स मॅगझिन आॅफिसात ते रुजू झाले. नोकरी करता करता ज्यूंच्या शिक्षणासाठी ते सतत विचार करत, त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ज्यू बांधवांसाठी शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. १८५३ साली त्यांनी ‘बेने इस्रायल परोपकार मंडळ’ आणि 
५ जुलै १८७५ रोजी या शाळेची स्थापना केली. १८८८ साली त्यांनी एका ज्यू प्रार्थनालयाचीही स्थापना केली. आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचा मोठा ज्ञानवृक्ष झाला आहे.
सर एली कदुरी
एली कदुरी हे बगदादी ज्यू कुटुंबातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. १८८० साली त्यांनी शांघायला ‘डेव्हिड ससून अ‍ॅण्ड सन्स कंपनी’मध्ये काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी चायना लाइट अ‍ॅण्ड पॉवर कंपनीमध्ये समभागांचा मोठा वाटा उचलला. आज ही कंपनी चीनसह पूर्व आशिया, आॅस्ट्रेलियासह विविध देशांमध्ये कार्यरत आहे. एली कदुरी भारताच्या भेटीवर आले असता इस्रायली शाळेच्या प्रथम मुख्याध्यापिका रिबेका रुबेन यांनी शाळेच्या मदतीसाठी त्यांना विनंती केली. त्यांनीही उदार हस्ते देणगी दिली. पूर्व आशियात अनेक देशांत शिक्षणासाठी त्यांनी योगदान दिले. रिबेका रुबेन यादेखील ज्यू समुदायातील महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आणि बडोद्याच्या ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यानंतर त्यांनी इस्रायली शाळेचे मुख्याध्यापकपद स्वीकारले. ज्यू शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते. 
आता मिळाली ओळख
दोन हजार वर्षांपूर्वी भारतात आलेले ज्यू बांधव येथील संस्कृतीचाच एक भाग बनून गेले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपास भारतात ३० हजार असणारी त्यांची संख्या आता केवळ ४६५० आहे. त्यातील २४६६ सदस्य महाराष्ट्रामध्ये राहतात. इतक्या लहानशा समुदायासाठीही महाराष्ट्र सरकारने त्यांना अल्पसंख्याक दर्जा जाहीर केला आहे. असा दर्जा पश्चिम बंगालनेही यापूर्वी जाहीर केला आहे. आंध्र प्रदेश आणि गुजरातनेही असा दर्जा ज्यूंना द्यावा, अशी मागणी होत आहे. 
‘शनिवार तेली’
ज्यू धर्मीयांनी अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे यावर्षीच प्रस्ताव पाठविला आहे. तो विचारार्थ असून, त्याआधीच महाराष्ट्र सरकारने त्यांना अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल भेटीवर गेल्यास किंवा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू भारतात आल्यास ती वेळ साधून केंद्र सरकार ज्यू समुदायास अल्पसंख्याक दर्जा जाहीर करेल अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात रायगड, ठाणे, मुंबई आणि पुणे येथे ज्यू एकवटले असून, त्यांचे महाराष्ट्राशी आणि कोकणाशी विशेष नाते आहे. रायगड जिल्ह्यातील नौगाव येथे त्यांनी सर्वप्रथम आश्रय घेतला. तेल काढण्याचा व्यवसाय करत असल्याने आणि शनिवारी सुटी घेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना ‘शनिवार तेली’ असेही संबोधन मिळाले. त्याचप्रमाणे त्यांना ‘बेने इस्रायली’ (इस्रायलची लेकरे) असेही म्हटले जाते. ज्या गावांमध्ये स्थायिक झाले त्या गावाच्या नावाने त्यांनी पेणकर, किहिमकर, घोसाळकर, रोहेकर अशी आडनावे घेतली. १९७१च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे जे. एफ. आर. जेकब, डेव्हिड ससून, अभिनेत्री नादिरा, सुलोचना (रुबी मायर्स) अशा अनेक ज्यू धर्मीयांनी भारताच्या सांस्कृतिक, साहित्य, संरक्षण, व्यापार क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. डॉ. इ. मोझेस यांनी तर मुंबईचे महापौरपदही भूषविले होते.
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
 
 
 
 

Web Title: 14 decades of friendship forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.