विदर्भ जास्त तापमानाचा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:29 PM2019-05-20T14:29:30+5:302019-05-20T14:29:58+5:30
मागील काही दिवसापासून विदर्भातील शहरे विस्तवाशी खेळत आहेत, असे वाटते. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर या शहरातील तापमान ४५ अंशांच्या वर गेलेले आहे.
प्रा. योगेश दुधपचारे
मागील काही दिवसापासून विदर्भातील शहरे विस्तवाशी खेळत आहेत, असे वाटते. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर या शहरातील तापमान ४५ अंशांच्या वर गेलेले आहे, पश्चिम महाराष्ट्रातील जळगाव शहरसुद्धा विदर्भातील शहरांची स्पर्धा करत यांच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. या स्पर्धेत ही शहरे जगातील सर्वात जास्त तापमानाची केंद्रे म्हणून समोर येत आहेत. भारतीय हवामान खात्याने संपूर्ण देशभरातील विविध १७६ वेधशाळातून १९६९ वर्षापासून आजपर्यंत आलेल्या तापमानाच्या आकडेवारीच्या आधारे, हे स्पष्ट केले आहे की, विदर्भातील शहरे ही जगातील सर्वात जास्त तापमानाची आणि उच्च तापमान जास्तीत जास्त दिवस राहणारी केंद्रे म्हणून समोर आलेली आहेत. पुणे आणि दिल्ली येथील भारतीय हवामान खात्याच्या मुख्य वेधशाळेतील शास्त्रज्ञ ए.के. जयस्वाल, पीसीएस राव आणि वीरेंदर सिंग या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
उच्च तापमान म्हणजे काय? मनुष्याच्या शरीरातील अंतर्गत भागात तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके राहते, बाहेरचे तापमान कितीही बदलले तरी मनुष्याच्या शरीरातील या तापमानावर त्याचा परिणाम होत नाही, जर शरीरातील तापमान वाढले तर शरीर ते कमी करण्याचा प्रयत्न करते आणि जर ते कमी होत असेल तर शरीर तापमान निर्माण करीत असते किंवा ऊर्जा वाचविते. पण हे करीत असताना शरीरतंत्रावर परिणाम होत असतो. म्हणूनच हवामान खात्याच्या संशोधकांनी ३७ अंश आधार मानून एखाद्या ठिकाणचे मार्च ते जून महिन्यातील तापमान ३७ अंशांपेक्षा जास्त राहत असेल तर त्या दिवसाच्या त्या तापमानाला उच्च तापमान म्हणून नोंदविले आहे. संपूर्ण भारतातील प्रमुख १७६ वेधशाळांतून मिळालेल्या या आकडेवारीच्या आधारे ही उच्च तापमानाची शहरे कोणती याचा शोध घेण्यात आला.
मागील ५० वर्षांच्या आकडेवारीच्या आधारावर उच्च तापमान असलेली शहरे जी मिळाली आहेत, त्यात सर्वात जास्त शहरेही भारताच्या दक्षिण आणि मध्य भागातच आहे.
संपूर्ण १५ शहरांचा विचार केला तर असे दिसते की उत्तर भारताच्या तुलनेत मध्य आणि दक्षिण भारतातील शहरांतील तापमान आणि त्या शहरात उच्च तापमान असणाऱ्या दिवसांची संख्या जास्त आहे. बारमेरला ४९.९ अंश, आणि श्रीगंगानगर येथे तर ५० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. परंतु येथे फक्त ६९ दिवस उच्च तापमान राहते. यावरून विदर्भ आणि मध्य भारतातील इतर ठिकाणी या शहरातील तापमान कसे घातक बनत चालले आहे याचा अंदाज येतो. राजस्थानच्या वाळवंटात असणाºया बारमेर शहरात उच्च तापमान असणारे दिवस ८८ आहेत. परंतु त्या तुलनेत उन्हाळ्यात जळगावला ९६ दिवस, चंद्रपूरला ९२ दिवस उच्च तापमान राहते.
या अभ्यासातून आणखी एक गोष्ट पुढे आली आहे, ३७ अंश सेल्सिअसपेक्षा सरासरी कमाल तापमान कुठे आणि किती आहे याचा विचार केला तर, विदर्भातील लोकांच्या मनात धडकी भरेल. १९६९ पासून आजपर्यंतच्या कमाल तापमानाचे आकडे तपासले तर असे लक्षात येते की संपूर्ण भारतात कमाल तापमानाचे दोन केंद्र निर्माण झालेले आहे. यातील पहिले केंद्र राजस्थानमध्ये जैसलमेर-बिकानेरच्याजवळ ३९ अंश तापमानाचे, आणि दुसरे महाराष्ट्रात चंद्रपूरवर ४० अंश सेल्सिअस तापमानाचे दिसून येते. चंद्रपूरवर असलेला कमाल तापमानाचा हा केंद्रबिंदू सर्वात जास्त तीव्र आहे.
चंद्रपूरला भारतातील किंबहुना जगातील उच्च तापमानाचा हा केंद्रबिंदू निर्माण होण्याची कोणती कारणे असू शकतील, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. चंद्रपूरचे भौगोलिक स्थान २० अंश उत्तर इतके आहे, पृथ्वीतलावर २० अंश उत्तर आणि २० अंश दक्षिण या दोन अक्षवृत्तावर सर्वात जास्त तापमान नोंदवले जाते. परंतु पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात महासागरांचे आणि समुद्राचे पाणीच जास्त आहे. त्यामुळे २० अंश उत्तर अक्षवृत्त हा जगातील सर्वात जास्त तापमानाचा जमीन असलेला आपोआपच बनतो. पृथ्वीच्या विषुववृत्तावर कमाल तापमान सर्वाधिक नोंदवले जात नाही, याचे कारण विषुववृत्तीय भागात वर्षभर असलेले ढगांचे आच्छादन आणि त्या भागात दररोज दुपारी तीन ते चारच्या आसपास पडणारा पाऊस होय. म्हणूनच पृथ्वीतलावरील कमाल तापमान २० अंश उत्तर या अक्षवृत्तावर नोंदवले जाते. एकीकडे भौगोलिक घटक आणि दुसरीकडे चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात असलेली कारखानदारी, प्रदूषण, याशिवाय कोळसा खाणी या गोष्टींचा या उच्च तापमानात, आणि तापमानाच्या दिवसात किती वाटा आहे, या गोष्टीवरही संशोधन होणे गरजेचे आहे. चंद्रपूर भारतातील अतिशय प्रदूषित शहरांपैकी एक आहे. या शहराच्या परिसरात ३० च्यावर कोळसा खाणी, आशियातील अतिशय मोठया कोळशावर आधारित वीज केंद्रांपैकी एक केंद्र, जवळच घुग्घुस, बल्लारपूर ताडाळी, वरोरा, ही आणखी उद्योगाची केंद्र यामुळे चंद्रपूरच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात धूळ पसरलेली असते, सल्फर डाय आॅक्साईड, कार्बन डायआॅक्साईड, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी हरितगृह परिणामकारक वायू चंद्रपूरच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात आहेत. हे सर्व घटक हरितगृह परिणाम घडवून आणतात. सूर्याकडून येणारी ऊर्जा लघु लहरींच्या मार्फत येत असते. परंतु या ऊर्जने वातावरण तापत नाही. पृथ्वीतलावरून परत जाणारी ऊर्जा ही वातावरण तापवत असते, ही ऊर्जा मात्र हे वायू आणि धुळीचे कण रस्त्यातच अडवते आणि त्यामुळे चंद्रपूर परिसरात या घटकांमुळे हरितगृह परिणाम घडून येतो. पृथ्वीतलावरून परत जाणाºया ऊर्जेर्पैकी ८७ टक्के ऊर्जा हे घटक घडवीत असतात, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. एखाद्या लग्नाच्या मंडपातील उष्णतेसारखा या धुलीकनांचा परिणाम होत असतो.
यालाच ग्रीनहाऊस इफेक्ट असे म्हणतात. याच ग्रीनहाऊस इफेक्टमुळे चंद्रपुरातील दैनंदिन तापमान जास्त असते.या संशोधकांनी सिद्ध केले की भारतात ज्या भागांमध्ये उच्च तापमानाचे जास्त दिवस आहेत, त्याच भागात सरासरी कमाल तापमानसुद्धा स्थिरावलेले आहे. हे दोन्ही नकाशे एकमेकांसोबत तंतोतंत जुळतात. १९६९ पासून आजपर्यंत २०१० वर्ष भारताच्या संदर्भात सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले. मागील ५० वर्षे खालील वर्ष हे क्रमानुसार तीव्रतेकडुन कमी तीव्र असे गणले गेले आहेत, (२०१०, २०१२, २००९, २००४, २००३, २००२, २००७ आणि २००५) हे सर्व वर्ष मागील ५० वर्षांचा विचार केला तर एकाच दशकात यावीत यावरून हा देश आणि जग कुठे चालले आहे याचा अंदाज करता येतो.
(भूगोल विभाग प्रमुख, जनता कॉलेज चंद्रपूर.
तथा पर्यावरण अभ्यासक, चंद्रपूर.)