चिल्लर पार्टी

By admin | Published: November 1, 2014 06:43 PM2014-11-01T18:43:51+5:302014-11-01T18:43:51+5:30

चित्रपटगृहे ही जणू फक्त मोठय़ांसाठीच असतात; मग लहान मुलांनी त्यांना त्यांचे चित्रपट पाहायचे असतील, तर काय करायचे? या विचारातून सुरू झालेली विद्यार्थी चित्रपट चळवळ आता चांगलीच जोर धरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले, आशयघन चित्रपट पाहायला मिळत आहेत.

Chillar Party | चिल्लर पार्टी

चिल्लर पार्टी

Next

 संदीप आडनाईक

 
मोठय़ांसाठी असलेल्या चित्रपटाला भरपूर चित्रपटगृहे उपलब्ध आहेत; मग छोट्या दोस्तांसाठी का नसावीत? त्यांनी चित्रपट कोठे पहायचे? बरे, ते चित्रपट छोट्यांसाठी असतील तर ते बाबा, जेव्हा त्यांना वेळ असेल, तेव्हा घरी डीव्हीडीवर दाखवतीलही; पण मग चित्रपटगृहात मिळणारा आनंद कसा मिळणार.? या सार्‍याचा विचार करता-करता एक संस्कार चित्रपटाच्या माध्यमातूनही छोट्यांमध्ये रुजवता येईल, असा विचार करून दर महिन्याला एक चित्रपट दाखविण्याचा निर्णय झाला आणि सुरू झाली चिल्लर पार्टी!
 आज आजूबाजूला सामाजिक समतोलाचा विचार न करता वयात येणार्‍या मुलांमधील विचित्र व्यवहार अस्वस्थ करणारे आहेत. यात सिनेमा या माध्यमाचा प्रभाव सर्वांत जास्त आहे. सध्या चांगल्या-वाईट स्वरूपाच्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. यामध्ये संस्कारक्षम असलेले सिनेमे मुलांपर्यंत पोहोचावेत, सिनेमा का, कोणता व कसा पाहावा यासाठी कोल्हापुरात चिल्लर पार्टी ही विद्यार्थी चित्रपट चळवळ सुरू करण्यात आली आहे.
तंत्रबदलाबरोबरच जगू पाहणारी नवीन पिढी व सामाजिक समतोल राहण्यासाठी नव्या पिढीवर लक्ष ठेवणारी जुनी पिढी यांच्यातील बदलत जाणारा संवाद, व्यवहार यांना अनेक गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. यामध्ये प्रभावी असणारे माध्यम म्हणजे चित्रपट. याचा अर्थ असा नव्हे, की चांगल्या चित्रपटांची निर्मितीच होत नाही. अनेक सुंदर व संस्कारक्षम सिनेमे बनविले जातात; मात्र दुर्दैवाने ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. असे सिनेमे मुलांपर्यंत पोहोचावेत, या मुख्य हेतूने मिलिंद यादव यांच्या संकल्पनेतून र्मयादित स्वरूपात सुरू झालेली ही चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आता मोठी होत आहे. इतर जिल्ह्यांतही ही लागण लागावी, हा या चळवळीचा उद्देश आहेच.
याच चळवळीचा पहिला टप्पा म्हणून लहान मुलांसाठी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे ‘टू ब्रदर्स’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. टू ब्रदर्स ही लहानपणी हरवणे आणि मोठेपणी सापडणे, तशी सिनेमातील कित्येक वर्षे चालत आलेली कथा; पण येथे ताटातूट होऊन पुन्हा भेटणारे दोन भाऊ ही माणसे नसून दोन वाघाची पिले आहेत, या कथेवर आधारित आहे. या सिनेमासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य होता. 
एखाद्या शाळेने सुरू केलेल्या उपक्रमात सातत्य ठेवले, की त्याची व्यापक चळवळ कशी होते, याची प्रचिती आता येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधील ‘चिल्लर पार्टी’ या उपक्रमाच्या निमित्ताने येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ७ शाळांमध्ये आता हा उपक्रम सुरू झाला आहे. जगभरातील आशयघन चित्रपटांचा आस्वाद विद्यार्थी व पालकांना मिळतो आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक चित्रपट दाखविला जातो. ‘रेड बलून’ चित्रपटाने त्याची नांदी झाली आहे. कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. इतकी, की अखेर पालकांनाच आवाहन करावे लागले, की आपण आपल्या पाल्याला चित्रपटगृहात सोडून जा, पुन्हा न्यायला या. कारण, अनेक विद्यार्थ्यांना चित्रपट पाहायला खुच्र्याच उपलब्ध झाल्या नाहीत. आता तर ‘व्हॉट्सअँप’सारख्या सोशल मीडियाचा वापर सुरू झाला आहे. या माध्यमातूनही अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी या उपक्रमात मोलाचे योगदान राहिले आहे. ‘चिल्लर पार्टी’ नावाने व्हॉट्सअँप ग्रुप आणि फेसबुक पेजही तयार होत आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी एक चित्रपट पाहावा आणि त्यावर चर्चा करावी, या उद्देशाने चित्रपट दाखविले जाऊ लागले. याचा परिणाम सकारात्मक झाला. इतर शाळांतूनही ‘आम्हालाही चित्रपट द्या,’ अशी विनंती होऊ लागली. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी सर्व इच्छुक शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठीही एक चित्रपट दाखविण्यात आला. आता जिल्ह्यातील ७ शाळांनी या चळवळीत सहभागी होण्यात आनंद व्यक्त केला आहे. हा उपक्रम आपापल्या शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. केवळ चित्रपट पाहून त्यावर चर्चा करणे, इतकेच या उपक्रमाचे र्मयादित स्वरूप नाही. दिवाळीच्या सुटीत चित्रपट पाहायला येणार्‍या विद्यार्थ्यांतील ५0 विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्याकडून शॉर्टफिल्म तयार करून घेतल्या जाणार आहेत.

Web Title: Chillar Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.