रंगनृत्य दोन ऊर्जांचा मिलाफ
By admin | Published: October 14, 2016 02:31 PM2016-10-14T14:31:45+5:302016-10-14T15:11:01+5:30
आपण जे सांगू पाहतो ते बऱ्याचदा आपल्या कलेतून संपूर्णपणे सांगता येत नाही, लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. काही विषय असे असतात की ते सांगण्याचं माध्यमच वेगळं असतं.
- सोनाली नवांगुळ
आपण जे सांगू पाहतो
ते बऱ्याचदा आपल्या कलेतून
संपूर्णपणे सांगता येत नाही,
लोकांपर्यंत ते पोहोचत नाही.
काही विषय असे असतात की
ते सांगण्याचं माध्यमच वेगळं असतं.
मग कसं सांगायचं?
कसं पोहोचायचं रसिकांपर्यंत?
त्यातूनच मग एक वेगळा
फॉर्म सुचला..
रंगनृत्य’ म्हणजे?
- नाट्य आणि नृत्य यांनी युक्त संपूर्ण सादरीकरण म्हणजे ‘रंगनृत्य’. नाटक आणि पारंपरिक नृत्य यांची स्वत:ची म्हणून वैशिष्ट्यं आहेत. या दोहोंची ताकद व शक्तिस्थळं जाणून घेत केलेला परफॉर्मन्स असंही याला म्हणता येईल. अजूनही या संकल्पनेत नवे नवे आयाम मी शोधतो आहे.
‘रंगनृत्य’ आलं कुठून? त्याचीही काही परंपरा आहे का?
- हा पारंपरिक कलाप्रकार नाही. मी नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून ‘मास्टर्स इन भरतनाट्यम’ पूर्ण करून तिथंच लेक्चरशिप करत होतो. सतत नवं काही करून पाहण्याची ऊर्मी होती. कल्पना तर खूपच सूचत होत्या. त्या काळात प्रसिद्ध कथक कलाकार राजश्री शिर्के यांनीही कॉलेज जॉइन केलं होतं. राजश्री यांनी त्यांच्या ‘लास्य’ संस्थेकडून कल्पना प्रत्यक्षात आणाव्यात असं सुचवलं नि आम्ही कार्यक्रम करू लागलो. आपल्याला वेगळं काही सांगायचंय ही पण एक कल्पना असते. त्याचा शोध चालू होता.
शास्त्रीय नृत्याची म्हणून एक चौकट असते. कृष्ण, राधा, शिव, पार्वती अशा भक्तिमार्गातील गोष्टी नृत्याचं माध्यम वापरून उलगडणं असतं व ते योग्य प्रकारे होतंही. पण आजच्या काळाशी नातं सांगणारं काय व कसं सांगूया असं मला वाटत होतं. राजश्री यांनाही ते वाटत होतं. ‘शिव’, ‘अस्तित्व’ असे नृत्यातून नवा विचार मांडण्याचे प्रयोग आम्ही सुरू केले.
एकदा राजश्री यांनी द्रौपदीवरची एक अनुवादित बंगाली कादंबरी वाचली व तीस मिनिटांची एक नाटिका बसवली. स्त्री-पुरुष एकत्र आले की समाज एकाच दृष्टीतून तुम्हाला पाहतो. मैत्रीपलीकडचं व शारीरिक नसलेलंही नातं त्यांच्यात असू शकतं हा आजच्या काळात पुन्हा सांगण्याचा विचार या नाटकातून करता आला. द्रौपदी व कृष्ण एकमेकांना पत्र लिहितात या प्रसंगात थिएटरचा कॉम्पोनंट घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. नाटकाचं नाव होतं, ‘एक अबोध कथा’. पण मग मला करताना जाणवलं की थिएटर हे अभिव्यक्तीचं अत्यंत जोरदार व प्रगल्भ माध्यम आहे. मला वाटलं म्हणून मी काही लिहिलं नि वाचलं असं होणार नाही. ज्या शास्त्रीय नृत्याची परंपरा इतकी मोठी व जिच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे तिला धक्का न लावता काय करावं हे डोक्यात घोळू लागलं.
संगीत, साहित्य, विचार, तत्त्वज्ञान या मूलभूत पायावर शास्त्रीय नृत्य उभं आहे. कुठलंही असं मॉडेल तुम्हाला ब्रेक करता येत नाही. महाराष्ट्राच्या मातीतून आम्ही जन्म घेतल्यामुळे नाटक आम्हाला जास्त जवळचं वाटलं असेल. नाटकाचा फॉर्म शास्त्रीय नृत्याला जोडून घेण्यासाठी नाटकं पाहणं, लोकांशी बोलणं, दिग्दर्शकाचा शोध घेणं चालू होतं. दरम्यान चेतन दातारने उत्साहाने होकार भरला. त्याने आमचा ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ नावाचा संत साहित्यावरचा कार्यक्रम पाहिला होता व आमचा दर्जा व विचार त्याला पटला होता. असा प्रवास सुरू झाला. त्यानं आमचं द्रौपदीवरचं लेखन वाचलं नि त्याचं ‘श्यामसखी’ नावानं नाटकात रूपांतर केलं.
१९९९ साल होतं. ‘पृथ्वी’ थिएटरला त्याचा शो लागला. मी जे सांगू पाहतो ते बरेचदा मला नृत्यातून सांगता येत नाही किंवा काही विषय असे असतात की ते सांगण्याचं माध्यमच वेगळं असतं. नृत्य तसं डेकोरेटिव्ह, त्यातून अभिव्यक्त झालेलं पटकन लोकांना कळतंच असं नाही. शब्दातून लगेच कळतं. या दोन्हींचा मेळ करता येईल यातून आम्ही तिघांनी हा प्रयत्न केला. हा एक सैल असा फॉर्म घेताना मजा आली. त्याचं नाव काय हे ठरवताना थिएटर डान्स, थिएटरिकल डान्स असा खूप काथ्याकूट केला. डॉ. अशोक रानडेंशी बोललो. ते म्हणाले, रंग हा नाटकाशी संबंधित परंपरेतला शब्द आहे, त्याच्याशी मेळ घालत केलेलं नृत्य म्हणून तुम्ही याला ‘रंगनृत्य’ म्हणणं जास्त योग्य. मग तेच रूढ केलं.
मग पुढे?
- चेतन म्हणायचा, संगीत व नाटक एकत्र चालतात. एका टप्प्यावर सगळे नियम रीतसर पाळून गाणं येतं आणि ते संपताच नाटक सुरू होतं. त्याचप्रमाणे ज्या कुठच्या टप्प्यावर गाणं येतं त्याच टप्प्यावर डान्स येऊ शकेल का? सतत उलटेसुलटे विचार करून आम्ही पाहत, वाचत, बोलत होतो. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असे सगळेच गुण ठासून भरलेल्या चेतननं मग आमच्यासाठी स्वत: एक नाटक लिहिलं, ‘संगीत द्वंद्व’ नावाचं. संगीत म्हटलं की सगळ्या कला त्यात येतात, शीर्षकाने उत्सुकता वाढीला लागते. हेच जर ‘नाटक द्वंद्व’ म्हटलं तर लोक केवळ नाटकाच्या हिशेबाने येतात. ही कथा होती अंबा आणि शिखंडीची.
नॉन लिनिअर अशा पद्धतीनं ती सादर केली होती. एकच माणूस, दोन काळांमधल्या त्या त्या रूपांमध्ये आपल्याला दिसतो.
शिखंडी आपली कथा मागून व अंबा त्याच क्षणापासून सुरू करते. त्यातलं पहिलं वाक्य होतं, ‘हम दोनो एक है’ - इथं नृत्य यावं असं त्यानं सुचवलं. बरीच पानं चर्चा करताना रद्द व्हायची, कारण नृत्यातल्या काही हालचालीत आम्ही ते बांधू शकायचो. ३५ मिनिटांच्या या प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रिइंटरप्रिटेशन हा कदाचित फार मोठा शब्द आहे. अंतरंगाची कथा करणं, शब्द फुटू शकत नाहीत अशा अनुभवाच्या ब्रेकिंग पॉइंटला डान्ससारखं परिणामकारक माध्यम वापरता येईल का? तर शोध घेतच हे चाललं होतं.
नृत्यात अभिनय असतोच, कदाचित अभिनयात प्रत्येकवेळी नृत्य नसतं. नृत्यात व नाट्यात एकाचवेळी राहणं आणि ते मिसळून जाणं हे कसं साधायचं?
- चेतनबरोबर काम करताना आम्ही दोन वर्षं बाकायदा नाटकाचं ट्रेनिंग घेतलं. पाठांतरापासून ते थिएटर म्हणजे काय? त्यात काय महत्त्वाचं? शब्द, वाक्य कशाप्रकारे देहबोलीतून आणि त्याशिवाय येतात याचा पूर्ण अभ्यास केला. नाट्यशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलंय की ‘नृत्य पदार्थाभिनयात्मक आहे, तर नाट्य हे वाक्यार्थाभिनयात्मक आहे’. उलगडा नंतर झाला. चेतन जेव्हा म्हणायचा, नाटक बोलायचा प्रयत्न करा, खोटं बोलू नका, खरं बोला! तेव्हा ते अभिनित कसं करायचं आणि त्यातून आवाजापासून सगळ्यात कसा फरक पडतो, त्यामुळे वाक्याचा वाच्यार्थ कसा बदलतो हे सगळं जाणवत गेलं. नृत्य करताना समजा मी एखादं पद घेतलं तर ते एखाद्या कवितेसारखं होतं, ‘पोएट्री आॅफ बॉडी मूव्हमेंट इन टाइम अॅण्ड स्पेस’. कविता सर्वसाधारणपणे काही ओळी रिपिट करत आपण वाचतो, ती जड असेल तर ऐकणाऱ्याला वेळ देत वाचन होतं. त्यात व्याकरण निघून जातं. हेच जेव्हा नृत्यात येतं तेव्हा एका पदावरून दुसरं आणि त्यातून तिसरं येतं कसं याला महत्त्व मिळतं. चिडून नायिका म्हणते की तू इथं का आलाहेस? ही ओळ आम्ही नृत्यात दहा वेळा करतो. हात, डोळे आणि चेहऱ्याच्या अभिनयातून. नायिका चिडली आहे या भावनावेगाला धरून त्या हालचाली तयार होतात. बंदिश गाताना तीच ती ओळ गाताना ज्या लयकाऱ्या येतात त्या गायकीत मजा असते. नाटकात मात्र स्वगत झालं की संपलं! नृत्य आणि नाट्य ही संवादाची माध्यमं आहेतच - नृत्यात एक पद म्हणजे एक पदार्थ, एका शब्दाचा अर्थ! त्यावरून दुसऱ्या आणि त्यावरून तिसऱ्या शब्दातून एकूण वाक्याचा अर्थ बनतो. नाट्यात एका वाक्यावरून दुसरं आणि दुसऱ्यावरून तिसरं असं कळत जातं. मग पूर्ण उतारा समजतो. चेतन म्हणायचा की वाक्याचा अर्थ लागला पाहिजे. एक शब्द मोठा होऊन चालणार नाही. असा मेळ जमवत आम्ही ‘रंगनृत्य’ खुलवत होतो. नृत्य करताना छोट्या छोट्या हालचाली ठरवत आम्ही गोष्ट उभी करतो, कारण वेगळा मुक्काम अपेक्षित नसतो. नाटकात कुठलाही नट एका जागी बसून नसतो, त्याला त्याचा संवाद नसतानाही हालचाली दिलेल्या असतात. माध्यमांच्या वृत्तीतले असे नेमके फरक लक्षात ठेवून, शेवटचे बिंदू मनावर गोंदवत आम्ही पुढे गेलो. पुढे त्याच्याबरोबर ‘घटोत्कच’, टागोरांच्या कथेवर आधारलेलं ‘संगीत गिरीबाला’ केलं.
नृत्य व नाट्यासाठी लागणारी ऊर्जा वेगवेगळ्या असतात का? असतील तर कलाकारावर कशाप्रकारचा तणाव असतो?
- हा प्रश्न आमच्या दृष्टीने मोठा होता. नृत्य झाल्यावर शब्दाची ताकद पडायची कारण नृत्याची ऊर्जा फार पटकन व मोठ्या प्रमाणात तयार झालेली असते. मग दरवेळेस एक ड्रॅमॅटिक पॉइंट आणावा लागायचा. संगीत नाटकात समोरचा तीच ओळ पुढे नेऊ शकतो तशी शक्यता इथं नव्हती. मग वेगळी एण्ट्री आणायची आणि तिथं नाट्य निर्माण करायचं, त्यातून पुढचे प्रश्न पेरायचे. शॉकिंग आणि टर्निंग पॉइंट आणायचे. या दोन्ही ऊर्जा समरूप करताना फार तल्लख राहावं लागतं. आणखी एक की प्रयोग करताना स्वत:च्या मूळ माध्यमाबद्दलचा विचार अंतर्मनात चालू असतो, की लोक येताहेत का? बघताहेत का? का बघताहेत? गरज आहे का? आपण कशासाठी करतो आहोत? उत्तर शोधावं लागणार हे चेतन सांगून गेला होता. ते करता करता मलाही जाणवलं की थिएटरवाले तुम्हाला डान्सर समजतात आणि डान्सर समजतात की तुम्ही हल्ली थिएटर करताहात म्हणजे तुम्ही डान्स सोडलेला आहे. तेही तुम्हाला गंभीरपणानं घेत नाहीत. तुमची पकड ढिली होत जाते. म्हणून तुमच्या माध्यमावरची पकड ढिली होऊ न देता, रियाज करत, नव्या माध्यमाची सर्व तांत्रिक अंगं आत्मसात करायला हवीत. वयाच्या दहाव्या वर्षापासून मी फक्त नृत्यच करतोय त्यामुळे मी इतर माध्यमांकडे पाहिलंच नाही. नृत्य आणि नाटक या दोन्ही माध्यमातून कृष्ण उभा करताना अभ्यासात किती फरक पडत जातो हे अनुभवलं आहे. या दोन्ही ऊर्जा मला कलाकार म्हणून अधिक नेमकं करतात.
परंपरेनं चालत आलेल्या कला सामान्य जनजीवनाशी फटकून किंवा माणसं या पारंपरिक कलांशी फटकून असतात असं का?
- याचं मुख्य कारण खूप मिडिआॅकर एक्सपोजर. महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर कथक, भरतनाट्यमचा आठवड्याला दोन तास याप्रमाणे सात वर्षांचा कोर्स जो पूर्ण करतो त्याला व्यावसायिक डान्सर म्हणावं का? दहा वर्षं शिकून दहावी पास झालात, त्यापुढे पाच वर्षं बी.ए. केलंत तर लगेच तुम्हाला कुणी जॉब देतं का? तासन्तास घासावं लागतंच ना? नृत्याबाबतीत सात वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लगेच नृत्यवर्ग काढला जातो. मुलाला प्रवेशाबाबतीत आपण किती शाळा पाहतो व मग चाळण लावत निवड करतो. नृत्याबाबतीत जवळचा कुठलाही ‘क्लास’ चालून जातो. माणसं टीव्हीला खिळलेली. इतक्या गर्दी आणि रहदारीतून ती मुद्दाम असे कार्यक्रम बघायला जात नाहीत, कारण या बाबतीत आपली मानसिक घडणच तयार झालेली नसते. माझ्या ‘सांख्य’ संस्थेतर्फे मंद्र फाउंडेशनच्या मदतीने आता मुंबईतल्या शाळाशाळांमध्ये जाऊन आम्ही मुलांना काय आवडतं, त्यांच्या अभ्यास-क्रमातल्या कविता, पाठ वाचून काही बसवता येईल का? याचा प्रयत्न करून हा अडसर कमी करणार आहोत. अशा कला त्यांना आपल्याशा करता याव्यात यासाठी संशोधन आणि प्रयोग करणार आहोत. शिस्त म्हणून असणाऱ्या पारंपरिक चौकटींना व्यापक करत या कलांना समकालीन विषयांपर्यंत नेऊन साध्या माणसांशी जोडता येणं हे करायलाच हवं आहे.
भरतनाट्यम या पारंपरिक नृत्यकलेतलं एक जाणतं नाव म्हणजे वैभव आरेकर. स्वत:च्या ‘सांख्य’ या संस्थेच्या माध्यमातून ‘सिंधू महोत्सवा’सारखा रंगमंच विविध नृत्यकलांना ते देत आले आहेत. ‘रंगनृत्य’ सारख्या प्रयोगशील संकल्पनेमुळे वैभवना स्वत:च्या कलेकडे नव्याने पाहण्याची संधी मिळाली. पारंपरिकता आणि नवता याचा समन्वय साधून येणारं ‘रंगनृत्य’ म्हणजे काय? ते कसं सापडलं? अभिव्यक्तीला ते कुठे घेऊन जाऊ शकेल याबद्दल त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा...