जिव्या सोमा मशे

By अोंकार करंबेळकर | Published: May 20, 2018 11:29 AM2018-05-20T11:29:30+5:302018-05-20T11:29:30+5:30

विख्यात वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना गेल्यावर्षी भेटलो. लंगोट लावलेली. कोयत्याने आंबा कापून खात होते. नजर कमजोर, ऐकायला येत नव्हतं, त्यांच्या थरथरत्या हातात रंगाची डबी आणि काडी देताच कागदावर मुंग्यांची रांग सरकू लागली.. जिव्या आज नाहीत; पण घराघरांतले दिवाणखाने त्यांच्या चित्रांनी जिवंत केले आहेत..

Jiva Soma Mashe | जिव्या सोमा मशे

जिव्या सोमा मशे

Next

जिव्या सोमा मशे गेले. मंगळवारी एका ओळीचा संदेश फोनवर आला आणि पुन्हा डोळ्यांसमोर डहाणू यायला लागलं. वारली चित्रांबरोबर त्यांचं नाव कायमचं जोडलं गेलं आहे..
इंटरनेटवर त्यांच्याबद्दल भरपूर माहिती मिळते, त्यांचे पुरस्कार, फोटो पाहायला मिळतात; पण ‘वारली चित्रांची ओळख करून देणारा डहाणूजवळ राहणारा माणूस’ एवढीच प्रमुख माहिती त्यातून मिळायची. त्यामुळे त्यांना एकदा भेटायला जायला हवं असं सारखं मनात येई, शेवटी गेल्यावर्षी त्यांच्या भेटीचा योग आला होता.
उन्हाळा संपून नुकताच पावसाळा सुरू होण्याचे दिवस होते. डहाणू स्टेशनला उतरलो तेच प्रवाशांचं स्वागत करणारी वारली चित्रे पाहत. डहाणू, तलासरी हा गुजरात आणि दादरा नगर हवेलीला चिकटलेला सगळा पट्टा आदिवासींचा आहे. बोर्डी, घोलवड, डहाणूचे चिकूही प्रसिद्ध आहेत. एक काळ अनुताई वाघांच्या बालवाडीच्या प्रयोगाने आणि कॉ. गोदुताई परुळेकरांच्या कामामुळे हा परिसर गाजला होता. अनुताई आणि गोदुतार्इंच्या नंतर आता जिव्या मशेही आपल्या कामाच्या भक्कम खुणा मागे ठेवून गेले आहेत.
डहाणूला उतरताच मराठी, गुजराती आणि स्थानिक आदिवासींची भाषा या तिन्हींचे मिश्रण होऊन तयार झालेली एक वेगळीच भाषा कानावर पडू लागली. या सगळ्या आदिवासी पट्ट्यात डहाणूच काय ते मोठं शहरवजा गाव आहे. हॉटेलं, कपड्यांची दुकानं, बँकांची संख्या वाढत या गावाचा तोंडवळा आता बदलू लागलाय.
जिव्या सोमा मशे आठ-दहा किलोमीटर जवळच्या गंजाड गावात राहतात एवढं माहिती होतं म्हणून तिकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षामध्ये बसलो. डहाणू-जव्हार रस्त्यावर डहाणूची घरं वेगाने मागे जाऊ लागली. थोड्याच वेळात गंजाडला जाऊन पोहोचलो. आदल्या दिवशीच येथे बाजार होऊन गेला होता. त्यामुळे काही दुकाने अजूनही तेथेच होती. कपड्यांची, भाज्यांची दुकाने रस्त्यावर अजून सुरू होती. एक-दोन चहा-भजीची हॉटेलंही सुरू होती. आजूबाजूच्या बारा पाड्यांनी मिळून गंजाडमध्ये गट ग्रामपंचायत स्थापन केली आहे. या गंजाड ग्रामपंचायतीजवळच मशेंचं घर आहे असं डहाणूत समजलं होतं, म्हणून ग्रामपंचायतीकडे जायला निघालो.
जिव्या मशे जागतिक दर्जाचे चित्रकार असल्यामुळे त्यांचं घर चटकन सापडलं. पण घरात कोणीच नव्हतं. मशेंची दोन घरं आहेत आणि नेमके आदल्या दिवशीच शेजारच्या कळंबीपाड्यातल्या घरात ते राहायला गेले होते. कळंबीपाडा नक्की किती लांब आहे ते कळत नव्हतं. खरं तर शेजारी असलेला हा पाडा गंजाडच्या लोकांच्या मानाने एकदम जवळ होता; पण म्हटलं आपण रिक्षानेच जाऊ. जव्हार रस्त्यावर परत आल्यावर केतन तुंबरा नावाचा तरुण रिक्षावाला मशेंच्या घरी यायला तयार झाला. पंचविशीतला केतन चांगलाच बडबड्या निघाला. आजूबाजूची भरपूर माहिती तो सांगत होता. मूळचे तलासरी तालुक्यातले मशे खूप वर्षांपूर्वी कळंबीपाड्याला स्थायिक झाले. कळंबीपाड्याला मशे यांच्या मुलांनी आता दोन पक्की घरं बांधली आहेत. त्याच्याजवळच मशेंची मूळ जुनी झोपडी आहे. कुडाच्या आणि सारवलेल्या भिंती आणि कौलारू छप्पर असलेली ही झोपडी आज मशे लोक भात साठवायला वापरतात. मशे आपल्या धाकट्या मुलाच्या घरी राहात होते.
केतनचं बोलणं ऐकत पुढे गेलो तर फक्त लंगोट लावलेले स्वत: मशे खुर्चीत बसून कोयत्याने आंबा कापून खात बसले होते. फोटोतले मशे आणि प्रत्यक्ष दर्शन यांत खूप फरक जाणवला. मशे चांगलेच थकले आहेत. आम्ही आलो म्हटल्यावर घरातली सगळी मंडळी बाहेर आली. जिव्या मशेंचा धाकटा मुलगा बाळूही त्यात होते. मशेंना आणि तुम्हाला भेटायला आलो म्हटल्यावर सगळ्यांनी स्वागत केलं. मशेंना फारच कमी ऐकायला येत होतं, त्यामुळे मोठ्याने बोलायला लागत होतं. पण आमचं काहीच त्यांना समजत नव्हतं. त्यांना त्यांच्या वारली लोकांच्या भाषेची सवय होती.
घरातले लोक त्यांना आमचं म्हणणं मोठ्याने ओरडून समजावत होते. थोडंफार बोलणं झाल्यावर बाळू यांच्याबरोबर आम्ही आत गेलो. सगळ्या घराच्या भिंती चित्रांनी आणि पुरस्कारांनी भरलेल्या होत्या. मशे यांना २०११ साली मिळालेली पद्मश्री पदवीही त्यांनी दाखवली. एका बाजूला कोपºयात वारली चित्रांमधले सर्वात प्रसिद्ध असणारे वारली गावाचे चित्र होते. असे चित्र वारली लग्नांमध्ये सजावटीसाठी वापरतात. या चित्रांमुळेच मशे सगळ्या जगाच्या समोर आले.
मशेंची चित्रकला सर्वात आधी कशी प्रसिद्ध झाली विचारल्यावर बाळू म्हणाले, ‘‘आमच्या वारली लोकांमध्ये लग्नांत ‘बामण’ नसतो. ठरावीक सवाष्ण बायका लग्न लावतात. त्या बायका लग्नघरात विवाहाच्या साहित्याची सगळी मांडामांड करतात. त्यात ही चित्रेही असतात. लग्न म्हटलं की हे चित्र काढावंच लागतं. तरुणपणी असेच एकदा या सवाष्ण बायकांबरोबर चित्र काढायला जिव्या मशे गेले होते. त्यावेळेस मालाडच्या एका डेकोरेटरने त्यांची चित्रकला पाहिली. हा मुलगा ही सुंदर चित्रं सटासट वेगानं काढतो हे पाहिल्यावर त्याने मशेंना आणखी चित्रे काढायला सांगितली. त्या दिवसानंतर मशेंना लग्नात डेकोरेशनसाठी चित्रे काढायला मोठ्या प्रमाणावर बोलावणी यायला लागली.’’
चित्रकलेचे काम सुरू करण्याआधी जिव्या एका सावकाराकडे महिना ६० रुपयांवर काम करत असत.
तारपा नृत्याचे ते प्रसिद्ध चित्र बाळू समजावून द्यायला लागले. दुधी भोपळ्यापासून आम्ही तारपा तयार करतो, असे सांगत त्यांनी वाळवायला ठेवलेले दोन दुधी दाखवले. चित्रामध्ये एका बाजूला तारपा नृत्य होते. या चित्रात मध्यभागी असते ती वारलींची पालगुड देवी. लग्नात मदत करणाºया सवाष्ण बायका, करवलीही त्यात असते. वाघ, मासे, मासेमारी करायची जाळी, झाडं असं वारलींच्या नेहमी आजूबाजूला असलेल्या गोष्टी त्यात चितारलेल्या होत्या. मशेंचं एक मासेमारीचं चित्रही चांगलंच प्रसिद्ध झालं, तेसुद्धा पाहायला मिळालं.
आजकाल शहरात वारली चित्रं रंगाने कागदावर काढली जात असली तरी मशे आणि त्यांची मुलं, नातवंडं तांदळाच्या पिठाने आणि ब्रशऐवजी काडीने चित्रं काढत. आजही काढतात.
बाळू सध्या वारूळाचं एक सुंदर चित्र काढत आहेत. म्हटलं जिव्या अजूनही चित्र काढतात का? तर ते म्हणाले, ‘नाही! आता फारसं नाही जमत त्यांना! हात थरथरतात त्यांचे. तरीही त्यांच्या डोक्यात ही सगळी चित्रं आहेत. चित्रांच्या कल्पना डोक्यात येत असतात. आज सकाळीच मला कागद आणि पीठ कालवलेला डबा देत म्हणत होते.’
त्यांना म्हटलं, आता काढतील का काही ते? बाळूंनी मशेंच्या हातामध्ये वारूळाचं चित्र, रंगाची डबी आणि काडी देताच त्यांनी चित्र पूर्ण करायला घेतलं. थरथरत्या डाव्या हाताने ते मुंग्यांची रांग काढू लागले. मशेंना चित्र काढताना पाहणं खरंच भारी वाटत होतं.
बाळू म्हणाले, १९७६ साली त्यांना पहिल्यांदा दिल्लीला जायचं होतं. तेव्हा हे आतासारखे फक्त लंगोट लावून निघाले होते. प्रवासाला जाण्यासाठीही त्यांच्याकडे कपडे नव्हते. शेवटी गावातल्या एका माणसाने त्यांना पँट दिली, मग ते दिल्लीला गेले.
आज मशेंचं कुटुंब वारली चित्रांसाठीच काम करतं. सदाशिव आणि बाळू हे त्यांचे दोन्ही मुलगे आणि नातवंडं चित्रं काढतात, शिकवायलाही जातात. जिव्या मशेंची चित्रं फ्रान्स आणि जर्मनीमध्येही प्रसिद्ध गॅलरीमध्ये झळकली आहेत. बाळूही चित्रांच्या प्रदर्शनासाठी आणि शिकवण्यासाठी जपान, जर्मनी, ब्राझीलला जाऊन आले आहेत. चित्रं आणि फोटो पाहिल्यानंतर आम्ही त्यांचा निरोप घेतला...
दुकानांचा झगमगाट आणि थोडीशी गर्दी यामुळे डहाणू थोडं शहरासारखं होऊन एक बेट झालंय; पण चारही बाजूंनी गरिबीच्या समुद्राने त्याला वेढलंय असं गंजाडच्या भेटीने वाटायला लागलं. डहाणू तालुक्यात बºयाच ठिकाणी सामाजिक संस्था काम करतात, आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळाही स्थापन केलेल्या आहेत. पण वारली लोकांची स्थिती फारशी बदललेली नाही. आजही कंबरेला टॉवेलवजा गुंडाळलेले एक कापड आणि वरतीही तसेच आखूड वस्र अशाच कपड्यांत तिथल्या महिला होत्या.
डहाणू-जव्हार रस्ता सोडला तर फारसं काहीच बदललेलं दिसलं नाही. मशे आज नाहीत, मात्र कागद, कपडे, छत्री, दिवे अशा साºयाच वस्तूंवरील मशेंची चित्रं वारली संस्कृतीला घेऊन जगभरात फिरत राहतील. मशेंच्या पश्चात वारली चित्रांबरोबर वारलींची स्थितीही सुधारावी ही अपेक्षा..

(ओंकार लोकमत ऑनलाइनमध्ये उपसंपादक आहे.)
 

Web Title: Jiva Soma Mashe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.