संगीत स्वरसाज
By admin | Published: October 28, 2016 04:37 PM2016-10-28T16:37:37+5:302016-10-28T17:15:07+5:30
संगीत म्हणजे आत्म्याचा आवाज. याच संगीताच्या जादूनं ग्रामीण भागात गारुड केलं आहे. संगीताचा उपयोग करून शिक्षक अनेक अफलातून उपक्रम राबवताहेत.
- हेरंब कुलकर्णी
संगीत म्हणजे आत्म्याचा आवाज.
याच संगीताच्या जादूनं
ग्रामीण भागात गारुड केलं आहे.
संगीताचा उपयोग करून
शिक्षक अनेक अफलातून
उपक्रम राबवताहेत.
शाळाबाह्य मुलांना
पुन्हा शाळेत आणण्यापासून
तर ग्रामीण भागातील कलावंत
हुडकण्यापर्यंत अनेक गोष्टी
यातून साध्य झाल्या आहेत.
दिवाळी हा रंगांचा आणि कलेच्या आविष्काराचा सण आहे. आज शाळांमधील कलेची अभिव्यक्ती बघूया. राज्यातील शाळांना कलाशिक्षक, संगीतशिक्षक नाही. खासगी शाळांशी स्पर्धा करायची असेल तर नक्कीच संगीतशिक्षक व वाद्ये सर्व ग्रामीण सरकारी शाळेत असायला हवीत. शासनाकडून कुठल्याही सुविधा मिळत नसतानाही अनेक शिक्षक संगीत विषयात विविध उपक्रम राबवताहेत.
भंडारासारख्या दुर्गम जिल्ह्यात स्मिता गालफाडे या आसगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका संगीत विषयात खूप प्रभावीपणे उपक्रम करतात. बालचित्रवाणीसाठी त्यांनी दुसरी व सहावीसाठी कविता स्वरबद्ध केल्या. बालभारतीच्या २१ कवितांना स्वरबद्ध करून त्या प्रशिक्षणातून संपूर्ण राज्यभर पोहोचविल्या आहेत. शालेय पोषण आहार योजनेत मुले जेवताना त्यांच्यासाठी ५० श्लोक लिहून त्यांचे स्वत: गायन केले आहे. मुलांसाठी पावसाळ्यात पाऊसगाणी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला.
शाळेचे सुसज्ज बॅँडपथक तयार केले आहे. राष्ट्रगीत व वंदे मातरम मुलांना चांगले म्हणता यावे म्हणून मुलांच्या आवाजात गाऊन घेतले व त्याची सीडी तयार केली आहे. उन्हाळी शिबिरांसाठी प्रेरणागीते लिहिली आहेत. शालेय कार्यक्रमासाठी स्वागतगीते, शाळागीते लिहिली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘फ्लॅश मोम्ब’ हा वेगळा कार्यक्रम शहराच्या चौकात घेतला. शाळेच्या स्नेहसंमेलनात लावणी, भारुड, शाहिरी अशा विविध पारंपरिक संगीताचा मुलांना अनुभव मिळतो.
ठाणे जिल्ह्यातील चेरवली येथील जि. प. शाळेला मी भेट दिली तेव्हा मुलींनी विविध समूहगीते ऐकवली. त्या चालवाद्यांचा वापर अतिशय थक्क करणारा वाटला. मुलेच सर्व वाद्ये वाजवत होती. डॉक्टर गंगाराम ढमके हे प्राथमिक शिक्षक. त्यांनी अनेक गाण्याच्या कार्यक्रमांत ध्वनिफितीत गायन केले आहे.
वर्गात कविता ते तालासुरात गातात. त्यातून मुलांना विषयाची गोडी लागली. शाळेचा परिपाठ संगीतमय असतो. मुले ध्यानस्थ बसतात व ढमके सर शास्त्रीय आलाप गातात. अभ्यासात गोडी नसणारी मुलेही वाद्य वाजवू लागल्याने त्यांना शाळेची गोडी लागली.
सोमनाथ वाळके, जि. प. केंद्र, प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी, जि. बीड यांनी संगीत विषयासाठी तंत्रज्ञान ही नवीन संकल्पना मांडली. आजमितीस शाळेत विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद तयार असून, कॅसिओ, ढोल, ड्रम, खंजीर, ताशा, ढोलकी, झांज, ट्रॅँगल, बिगुल अशी वाद्ये विद्यार्थी स्वत: अप्रतिमपणे वाजवितात..
मुलांच्या गायनकलेला वाव देण्यासाठी शाळेत कराओके सिस्टीम तयार केलेली असून, या सिस्टीममध्ये विविध हिंदी-मराठी गीतांचे संगीत तयार असून, विद्यार्थ्यांनी त्याच्या तालावर गीत म्हणायचे असते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या प्रयोगातून गायक म्हणून तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनी गायलेल्या गाण्यांचे रेकॉर्डिंग व एडिटिंग शाळेतच केले जाते. त्यासाठी राज्यातील पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ या शाळेत उभारला आहे.
म्युझिक स्टुडिओ ही एक नावीन्यपूर्ण संकल्पना असून, यामध्ये विविध पारंपरिक तसेच विदेशी वाद्ये जमा करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यात कॅसिओ, ढोल, ड्रम, ताशा, ढोलकी, झांज, ट्रॅँगल अशी बरीच वाद्ये लोकसहभागातून उपलब्ध केली आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संगीताबद्दल आवड निर्माण झाली. अभ्यासात मागे असणार विद्यार्थी वाद्ये वाजविण्यात तसेच गायनकलेत अग्रेसर होते. संगीताच्या जादूमुळे ही मुले शाळेत १०० टक्के उपस्थित राहू लागली तसेच शाळेच्या इतर उपक्रमांतसुद्धा हिरीरीने सहभागी होऊ लागली.
श्रीकृष्ण बोराटे (जिल्हा परिषद शाळा, कुवरखेत, ता. धडगाव) यांनी प्रगत शिक्षणधारा बालगीते ही ध्वनिफीत तयार केली. त्यासाठी स्वत: ८०००० रुपये खर्च केला. ती सीडी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रशाळेला भेट दिली. त्यातील गाणी व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे पाठवली. जलसंवर्धन, आहार, वाचन अशा विविध विषयांवर गाणी तयार केली आहेत. याचा सकारात्मक परिणाम होतो. मुले हिरव्या भाज्या खाऊ लागली. घरी पाणी नासत नाहीत, असे पालक सांगतात.
ज्योती बेलवले या ठाण्याजवळील केवणीदिवे येथील उपक्रमशील शिक्षिका तंत्रज्ञानाच्या मदतीने संगीताचा शिक्षणात उपयोग करतात. अभ्यासक्रम बदलल्यावर त्यांनी लावलेल्या कवितांच्या चाली त्यांच्या ब्लॉगवर टाकल्या.
त्या राज्यात अनेक शिक्षकांना उपयुक्त ठरल्या. ब्ल्यू टुथ स्पीकरचा आवाज खूप मोठा होतो व तो मोबाइलला जोडला जातो. त्याचा वापर करून त्या मुलांना गाणी ऐकवतात किंवा मुलांना गाणी म्हणायला लावतात. भोंडल्याची गाणीही ऐकवितात. शाळेत गाणी गाताना माठ, चमचा, ग्लास त्या वापरतात.
शाळेत एकच हार्मोनियम असतो. त्यावर उपाय म्हणून अनेक पालकांचे बिघडलेले फोन त्यांनी गोळा करून दुरुस्त केले. त्यावर हार्मोनियम व इतर अॅप डाउनलोड केले. गाणी म्हणताना ते वापरले जाते. गोष्टींचे रूपांतर त्या गाण्यात करतात आणि ती गाणी मुलांना ऐकवतात. त्यातून मुलांना खूप गंमत वाटते. अशीच चाल गणिताच्या पाढ्यांनाही लावली जाते. करावके या अॅपमध्ये गाण्याला आपोआप स्वरसाज चढवला जातो. त्याचाही वापर करून त्या गाणी गायला शिकवतात. अशा विविध अंगाने तंत्रज्ञानाचा वापर करून संगीताची गोडी लावली जाते.
झांजपथक हेही अनेक शाळांचे वैशिष्ट्य बनते आहे. गडहिंग्लजजवळ वडरगे या शाळेचे झांजपथक खूप सुंदर आहे. ते ऐकता आले. विविध प्रकार बघून थक्क झालो. विविध मिरवणुकीत या पथकांना बोलावले जाते. तेथील सुहास शिंत्रे या शिक्षकाना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
ग्रामीण भागात भजनाची मोठी परंपरा असते. अनेक शाळेत मुले भजन सुंदर गातात. भोर तालुक्यातील केंजळ येथील शाळेतील मुलांचे भजन गायन ऐकत राहावेसे वाटते. आपली मन:स्थितीच बदलून जाते.
खासगी शाळा स्वतंत्र संगीतशिक्षक नेमू शकतात. अनेक वाद्य संच घेऊ शकतात.
परंतु ग्रामीण भागातील गरीब शाळा आहे त्या संसाधनांतून संगीताचा वारसा ज्या कल्पकतेने चालवत आहेत ते खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी निर्माण केलेल्या पायवाटेचा महामार्ग व्हायला हवा.