... आता इथून पुढे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 06:06 AM2019-03-31T06:06:00+5:302019-03-31T06:10:02+5:30
अंतराळ विज्ञानात आणि तंत्रज्ञानात आपण खूप प्रगती केली असं वाटून थांबण्याचे टप्पे कधी येत नाहीत.
- तपन मिश्रा
(अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटर येथे कार्यरत भारताचे रडार मॅन!... इस्रो चेअरमनचे वरिष्ठ सल्लागार)
साधं गणित आहे, आपल्याकडे ताकद आहे पण ती ताकद खरंच आहे का, किती आहे हे जगाला कधीतरी दाखवावं लागतं आणि जगानं ते मान्यही करावं लागतं.
भारतानं ‘अॅन्टी-सॅटेलाइट मिसाइल’ म्हणजेच उपग्रहविरोधी क्षेपणास्राची चाचणी यशस्वी करून जगाला हे दाखवून दिलं आहे की, आमच्याकडे हे तंत्रज्ञान आहे. आम्ही ते स्वसंरक्षणासाठी सिद्ध केलेलं आहे. आणि जगासमोर आपलीही क्षमता सिद्ध करणारं हे यश म्हणजे भारतीय शास्रज्ञांनी घेतलेली एक मोठी अभिमानास्पद झेप आहे.
एक उदाहरण सांगतो, एक मोठ्ठा हॉल आहे आणि त्या हॉलच्या एका टोकाला एक माणूस उभा आहे, दुसऱ्या टोकाला दुसरा माणूस उभा आहे. आता आपण एका माणसाला सांगतोय की तुझ्या हातात जी टाचणी आहे, ती तू हवेत उडव आणि दुसऱ्याला सांगतो की तू गणित बांधून, वेगाचा अभ्यास करून अत्यंत अचूकतेनं ती टाचणी हवेतच मारायची आहे..
विचार करा हे काम सोपं आहे का?
अचूकता आणि वेगाचं हे गणित आहे, ज्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास लागतो. तंत्रज्ञानही लागतं. आपल्या शास्रज्ञांनी आपल्या क्षमता आणि तंत्रज्ञानावर शिक्कामोर्तब केलं आहे.
या क्षमतांचा वापर राष्ट्र आक्रमक होण्यासाठी करत नसतात. मात्र ज्याला ‘डिटरण्ट’ अर्थात प्रतिबंधात्मक क्षमता म्हणतात त्या आपल्याकडे असणं ही नव्या काळात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
संरक्षण, प्रतिबंधात्मक क्षमता हे तर महत्त्वाचं आहेच मात्र या गोष्टींचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आर्थिक सुरक्षितता आणि गुंतवणुकीचा. आर्थिक सत्ता बनायचं असेल तर या काळात तुमच्याकडे तंत्रज्ञानाची ताकद हवी. जगभरातले लोक भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतात कारण आपण त्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्यातून आर्थिक गुंतवणुकीलाही चालना मिळते आणि तंत्रज्ञानालाही. त्यामुळेच अशाप्रकारची डिटरण्ट क्षमता आपल्याकडे असणं ही नव्या काळात मोठी कमाई आहे. डीआरडीओनं केलेली ही कामगिरी म्हणून अत्यंत अभिमानास्पद आणि भारताच्या प्रगतीला पोषकपूरक ठरणारी आहे.
अंतराळ विज्ञानात आणि तंत्रज्ञानात आपण ‘कमावलं’ किंवा खूप प्रगती केली असं वाटून थांबण्याचे टप्पे कधी येत नाहीत. आता याहून पुढं जायचं आहे हे ध्येय सतत खुणावत असतंच. आजच्या घडीला अमेरिका आणि चीन यांची अंतराळ विज्ञानातील प्रगती आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. आपल्याला त्या दिशेनं जायचं आहे. तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम होत अधिक अचूक काम करायचं आहे. अंतराळ विज्ञानातील सत्ता आणि आर्थिक सत्ता यांचा ध्यास असेल तर आपल्याला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे.
(मुलाखत आणि शब्दांकन : मेघना ढोके)