महाराष्ट्रात काय चाललंय, सगळीकडे फॉग चालू आहे!

By अतुल कुलकर्णी | Published: November 26, 2023 01:19 PM2023-11-26T13:19:48+5:302023-11-26T13:20:43+5:30

Maharashtra News: बऱ्याच दिवसांपासून आपल्याला पत्र लिहिले नव्हते. महाराष्ट्राची ख्यालीखुशाली कळवायची राहून गेली होती. आज वेळ होता म्हणून पत्र लिहायला घेतले. तुम्ही तिकडे दूर देशी बसून महाराष्ट्राची चिंता करू नका. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. इथे लोकशाही परमोच्च स्थानी आहे. लोकशाहीचा अर्थ इथल्या लोकांना जेवढा कळला, समजला आणि उमगला, तेवढा अन्य कुठेही नसावा.

What is going on in Maharashtra, fog is going on everywhere! | महाराष्ट्रात काय चाललंय, सगळीकडे फॉग चालू आहे!

महाराष्ट्रात काय चाललंय, सगळीकडे फॉग चालू आहे!

- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)

प्रिय साहेब, 
बऱ्याच दिवसांपासून आपल्याला पत्र लिहिले नव्हते. महाराष्ट्राची ख्यालीखुशाली कळवायची राहून गेली होती. आज वेळ होता म्हणून पत्र लिहायला घेतले. तुम्ही तिकडे दूर देशी बसून महाराष्ट्राची चिंता करू नका. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. इथे लोकशाही परमोच्च स्थानी आहे. लोकशाहीचा अर्थ इथल्या लोकांना जेवढा कळला, समजला आणि उमगला, तेवढा अन्य कुठेही नसावा. जाती-जातीत, धर्मा-धर्मात अत्यंत सलोख्याचे वातावरण आहे. एका समाजाचा माणूस दुसऱ्या समाजाच्या माणसाचे लोकशाहीला स्मरून जाहीरपणे कौतुक करताना दिसतो. कोणीही उठतो, कोणालाही, काहीही बोलतो, इतके उत्तम संबंध या आधी जाती-जातीत कधीच निर्माण झाले नव्हते. ‘जात नाही ती जात’, हे ज्यांनी कोणी लिहून ठेवले असेल, त्यांनी महाराष्ट्रात येऊन बघावे. त्यांच्या विधानाचा किती आणि कसा उत्तम अर्थ घेतला गेला हे त्यांच्या लक्षात येईल. रस्त्याने चालताना, समोर एखादे लहान मूल अडखळून पडले, तर त्याला पटकन उचलून घेण्याआधी, ‘बाबा रे, तू कोणत्या जातीधर्माचा आहेस...’ एवढेच विचारायचे बाकी आहे. ते जर  विचारले तर उगाच जातीयतेचा शिक्का बसायचा, म्हणून अजून कोणी ते विचारत नाही.

नेत्यांमध्ये तर एकमेकांचे गोडकौतुक करण्याची जोरदार स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेसाठी बक्षिसं ठेवली, तर सगळीच्या सगळी महाराष्ट्रालाच मिळतील. उगाच कोणी आम्हाला चॅलेंज द्यायचे काम नाही. महाराष्ट्रातच नाही तर परदेशात जाणाऱ्या महाराष्ट्रीयन नेत्यावरही एकमेकांची करडी नसली तरी प्रेमळ नजर आहे. ते तिथे काय करतात? काय खेळतात? काय पितात? याची फोटोसह माहिती देण्याचे काम इथे अत्यंत पारदर्शकपणे सध्या महाराष्ट्रात होत आहे. एका बाजूने दोन फोटो दाखवले की, दुसऱ्या बाजूने लगेच त्याला प्रतिसाद म्हणून काही फोटो जनतेला दाखवले जात आहेत. ‘तेरी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे...’ हे विधान वॉशिंग मशिन पावडरच्या जाहिरातीसाठी महाराष्ट्रातून प्रेरणा घेऊनच बनवले असावे. राज्यात अत्यंत प्रेरणादायी लोक आहेत. ही तर सुरूवात आहे. येणाऱ्या काळात हे लोक पारदर्शकतेविषयी कसलीही सेन्सॉरशिप ठेवणार नाहीत. कशाला हवी ती...? एकमेकांच्या सगळ्या गोष्टी उघड करूनच दाखवायच्या, असे नेत्यांनी ठरवले आहे. गेले काही दिवस कपिल शर्मा शो बंद आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा पूर्वी सोमवार ते गुरूवार यायची. ती ही आता दोनच दिवस येते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचे निखळ मनोरंजन करणे हा या सगळ्यांचा मूलभूत हक्क आहे. तो सगळे इमानेइतबारे बजावत आहेत. कपिल शर्मा आणि हास्यजत्रावाले विनोद निर्मितीच्या बदल्यात पैसे घेतात. आमचे नेते नि:स्वार्थ भावनेने जनतेचे मनोरंजन करतात. त्यासाठी वेगळे पैसेही घेत नाहीत. उलट टीआरपी वाढविल्याबद्दल चॅनेलवाल्यांनीच नेत्यांना वेगळे मानधन द्यायला हवे, असे नाही का वाटत तुम्हाला..?

आमचे काम माधव टेलरसारखे आहे. कोणी कुठल्याही पक्षात असो, त्यांचे कपडे मात्र माधव टेलर शिवतो. तसेच सगळ्या नेत्यांसाठी सध्या स्क्रिप्ट लिहून देण्याचे काम अवघ्या महाराष्ट्रात दोनच लेखक करत आहेत. काहींच्या मते स्क्रिप्ट लेखक नागपूरला असतात... तर काहींच्या मते बारामतीला... शहराविषयी अद्याप स्पष्टता नाही. ती आम्हाला कळाली की, आपल्यालाही कळवू... कारण आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे. आमच्या नेत्यांच्या निष्ठादेखील फार टोकदार आहेत. दीड- दोन वर्षांपूर्वी वांद्र्यात राहणाऱ्या नेत्यांविषयी काही नेते एकही अपशब्द ऐकून घेत नव्हते. मात्र ती भूमिका आडमुठेपणाची आहे, असे त्यांना समजावून सांगण्यात आले. ते त्यांना लगेच पटले. त्यामुळे आता दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांविषयी मनमोकळेपणाने वाट्टेल ते बोलतात..! मनात काहीही ठेवत नाहीत. हा किती चांगला गुण आहे ना... पण हल्ली या गुणाचे कोणी कौतुक पण करत नाही... त्यामुळे वाईट वाटते.

आमच्या नेत्यांमध्ये आत्ता कुठे एकमेकांविषयी मोकळेपणा येऊ लागला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत आमचे नेते एकमेकांविषयी इतके मोकळेपणाने बोलू लागतील की, महाराष्ट्राच्या इतिहासात त्याची नोंद होईल. विकासाचे प्रश्न, प्रदूषणामुळे मुंबईची लागलेली वाट, जागोजागी कचऱ्यांचे ढीग, ढासळणारी आरोग्य व्यवस्था, शाळा-कॉलेजमधून तयार होणारी कारकुनांची फौज... या असल्या फालतू गोष्टींत फार लक्ष द्यायचे नाही, हे आमच्या नेत्यांनी मनाशी पक्के ठरवले आहे. त्यापेक्षा जाती-धर्मामध्ये मोकळेपणा येणे, एकमेकांच्या जाती-धर्माचे खुलेपणाने जाहीरपणे कौतुक करणे, त्यावरून सतत एकमेकांना शाबासकी देणे... वेळप्रसंगी नुरा कुस्तीप्रमाणे कुस्ती खेळणे या गोष्टी आमच्या नेत्यांसाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. हे त्यांना समजले आहे.

जाता जाता एक महत्त्वाचे सांगायचे राहिले. सध्या दोन मराठी माणसे एकत्र भेटली की, एकमेकांच्या अंगावर धावून जात एकमेकांची गळाभेट घेतात. गरजेनुसार एकमेकांना ‘भ’ची बाराखडी म्हणून दाखवतात. दोन मराठी माणसं या पद्धतीने एकमेकांना भेटताना पाहून यूपी, बिहारी लोकही तोंडात बोट घालत आहेत. महाराष्ट्र जसा जसा आणखी प्रगतशील आणि जास्तीत जास्त पुरोगामी होत जाईल, तसतसे आपल्याला अपडेट देत जाईन.       - आपलाच, बाबूराव

Web Title: What is going on in Maharashtra, fog is going on everywhere!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.